राहुल गांधींप्रमाणेच नरेंद्र मोदी गुजरात दंगली मान्य करणार काय? - नाना पटोले यांचा सवाल

March 03,2021

मुंबई : ३ मार्च - काँग्रेसचे नेते राहुल गांधी  यांनी आणीबाणी चूक ही प्रांजळपणे मान्य केली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे गुजरातमध्ये झालेली दंगल मान्य करतील का? भाजप याबद्दल माफी मागणार का? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थितीत केला आहे. तसंच, देशात कोरोना येण्यास नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चुकीची होती,  त्यावेळी जे घडलं ते नक्कीच चूक होतं. पण, आजच्या काळात जे घडत आहे ते एकदम वेगळं आहे' असं मत व्यक्त केले.

'राहुल गांधी यांनी जी काही भूमिका मांडली आहे ती नक्कीच गांधीवादी आहे. त्यांनी कोणत्या अहंकारातून हे विधान केले नाही. न ही त्यांनी गोडसेप्रेमी भक्ताप्रमाणे केले आहे. त्यावेळी लोकांना जो काही त्रास झाला त्याबद्दल त्यांनी एकाप्रकारे माफी मागितली आहे. पण देशावर सर्वात मोठा कलंक लागला होता तो गुजरातमधील गोंध्रामधील दंगल. हिंदू-मुस्लिम यांच्यात जो रक्तपात झाला होता. त्याबद्दल भाजप माफी मागणार आहे का?' असा थेट सवाल नाना पटोले यांनी विचारला.

तसंच, फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही.  शेतकरी आंदोलनाबद्दल भाजप सध्या मीडिया नौटंकी समोर करत आहे.रस्ते विकास नावाखाली, शेतकऱ्यांच्या नावे पैसे घेतात, टॅक्स लावतात, लोकांना लुटण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.

नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात आणि राज्यात कोरोना आला आहे. केंद्र सरकारने जर वेळीच पाऊल उचलले असते तर आज ही परिस्थिती पाहण्यास मिळाली नसती. राहुल गांधी यांनी सर्वात आधी याबद्दल इशारा सुद्धा दिला होता. आता राज्यात कोरोनाच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप करत आहे, पण कोरोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले प्रयत्न केले आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विधानसभा अध्यक्षाविना सुरू आहे. त्यामुळे याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घ्यावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.