कामगारांना थकीत पगार व्याजासह द्या - माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची मागणी

March 04,2021

चंद्रपूर : ४ मार्च - सिद्धबली इस्पात कंपनीत कार्यरत यापूर्वी कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने हक्क हिरावल्याचा निषेध व्यक्त करीत, त्यांना येत्या महिनाभरात थकित पगार व्याजासह देण्यात यावा, अशी मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे. यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. त्या बैठकीत त्यांनी सहाय्यक कामगर आयुक्तांना सुचना दिल्या. बैठकीला भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, खुशाल बोंडे, जिल्हा परिषद सदस्य रणजीत सोयाम, डॉ. शरद रणदिवे, सोनेगावचे सरपंच संजय उकीनकर, मनोज आमटे, निखिलेश चांभारे, विक्की लाडसे, विकास खटी, विनोद खेवले आदींची उपस्थिती होती. 

सिद्धबली इस्पात कंपनीने याआधीच्या स्थानिक कामगारांवर थेट अन्याय केला असून, हा अन्याय कुठल्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नसल्याची भूमिका यावेळी हंसराज अहीर यांनी घेतली. नियमानुसार सिद्धबली उद्योग संचालकांनी या कामगारांना आर्थिक मोबदला दिला पाहिजे तसेच त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. या कामगारांची सविस्तर यादी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयास सादर करून या सर्व कामगारांना संपूर्ण आर्थिक मोबदला मिळेल व रोजगारात प्राधान्य मिळेपर्यंत आपण हा मुद्दा रेटून धरणार असून, सिद्धबली उद्योगाचा मनमानी कारभार बंद करणार असल्याचा इशाराही यावेळी अहीर यांनी दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात 30 जुलै 2019 रोजी पार पडलेल्या बैठकीत कामगारांचे थकित पगार देण्याच्या सुचना दिल्या गेल्या. त्यानंतर 18 नोव्हेंबर 2019 रोजी पत्र दिले गेले. पण, कंपनी व्यवस्थापनाने कुठलीही कार्यवाही केली नसल्याची बाब अहिर यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्त यांच्या आदेशाचे अवहेलना करणार्या सिद्धबली उद्योगावर नियमाला अनुसरून कडक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी अहीर यांनी दिल्या. मागील आठवड्यात मध्यप्रदेश निवासी कामगाराचा उद्योग कार्यक्षेत्रात अपघाती मृत्यू झाला. त्या कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला अद्याप दिला गेला नाही. ती कार्यवाही त्वरीत करावी, स्थानिक मारोती रोगे याही कामगारांचा मृत्यू झाला होता. पण, त्यांच्या कुटुंबाचीही अवहेलना कंपनीने केली आहे. त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. याआधी कार्यरत सर्व कामगारांना त्याचे थकित पगार व्याजासह त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, कार्यरत कामगरांना किमान वेतन द्यावे, कामगारांचा भविष्य निधी जमा करावा, उद्योगात स्थानिकांना प्राध्यान्य द्यावे, याकडे जातीने लक्ष देण्याचे निर्देशही अहिर यांनी यावेळी सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले.