नदीपात्रात बेटावर सुरु असलेल्या अवैध दारूच्या कारखान्यावर धाड, साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

March 04,2021

भंडारा : ४ मार्च - वैनगंगा नदीच्या पात्रात एका बेटावर सुरू असलेल्या अवैध दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जवळपास साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीतील संगम बेटावर आरोपी जितेंद्र रनभिड मेश्राम (37) रा. पुर्नवसन/संगम याने मोहफुलाच्या दारूचा जनू कारखानाच उघडल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयवंत मेश्राम यांना मिळाली होती. 

माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हान यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी काही पट्टीचे तैराक नेमून पहाटेच्या घटनास्थळ गाठले. पोलिस नायक सतीश देशमुख यांनी नदीत पोहून किनाèयावर ठेवलेली नाव आणली. यात ते किरकोळ जखमी झाले. दरम्यान एक इसम दारू गाळण्याकरिता सडवा मोहफूल पिशवीत भरत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे ताब्यातून 227 प्लास्टीक व मातीच्या मडक्यात 100 किलोग्रॅमचे सडवा मोहपास, 900 लीटर हातभट्टी दारू, 10 हजार क्विंटल जळाऊ लाकडे व इतर साहित्य असा एकूण 6 लाख 58 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक रेवतकर, हवालदार धमेंद्र बोरकर, सतीश देशमुख, राजू दोनोडे, प्रशांत कुरंजेकर, सचिन देशमुख पार पाडली.