नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके केली जप्त

March 04,2021

गोंदिया : ४ मार्च - गोंदिया जिल्हा पोलिस दलाने नक्षल्यांनी घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगलात पेरुन ठेवलेले स्फोटके जप्त केली. ही कारवाई अर्जुनी मोर तालुक्यातील केशोरी पोलिस ठाण्यातंर्गत सोयगावटोली जंगल परिसरात करण्यात आली. 

नक्षल्यांनी सोयगावटोली जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या व पोलिसांंना ठार मारण्याच्या उद्देशाने  स्फोटके पेरुन ठेवली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाली. माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी, देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात सी-60 कमांडो पथक, केशोरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, भरनोली दूरक्षेत्राचे अधिकारी व अंमलदार व बॉम्ब शोध पथकाने सोयगावटोली जंगल परिसरात सर्व ऑपरेशन राबविले असता एक जर्मनचा डब्बा संशयास्पदरित्या आढळला. बॉम्ब पथकाने डब्ब्याची पाहणी केली असता त्यामध्ये 9 जीवंत डेटोनेटर, 3 जिलेटीन कांड्या, रसायनमिश्रीत रेेती अशी स्फोटके आढळून आली. ही स्पोटके जप्त करण्यात आली असून अज्ञात नक्षलवाद्याविरोधात केशोरी पोलिस ठाण्यात भारतीय स्फोटक पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई केशोरीचे ठाणेदार संदिप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक ठवकर, मारंग, जीवन पाटील तसेच अंमलदार, सी-60 कमांडो पथक व बॉम्ब शोधपथकाने केली.