रेल्वेगाडीच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू

March 04,2021

गोंदिया : ४ मार्च - हावडा-मुंबई रेल्वेमार्गावरील गोंदिया रेल्वे जंक्शनजवळील गंगाझरी रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर रेल्वेगाडीच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी सात वाजता घडली. गोंदिया येथून नागपूरकडे जाणाऱ्या  गीतांजली एक्सप्रेस ही गंगाझरी रेल्वेस्थानकापुढे धावत असताना रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर अचानक दोन अस्वल रेल्वेगाडीसमोर आले. यात रेल्वे इंजिनच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने याची माहिती गोंदिया रेल्वेस्थानकाच्या अधिकार्यांना सांगितली. रेल्वे अधिकार्यांनी तातडीने वनविभागाला घटना सांगितली. माहिती मिळताच गोंदिया वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन मृत अस्वलांना गंगाझरी येथील क्षेत्र सहाय्यक वनविभाग कार्यालयात पाठवून उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, वन अधिकार्यांनी या दोन्ही अस्वलाचे वय अंदाजे 3 वर्ष असून एका अस्वलाच्या डोक्याला व तोंडाला आणि दुसर्या अस्वलाच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या दोन्ही बाजुला घनदाट जंगल असून याच रेल्वेरुळावर काही महिन्यापूर्वी रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता.