लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

March 04,2021

चंद्रपूर : ४ मार्च - दारूड्या भावाशी झालेल्या मारहाणीत लहान भावाकडून मोठया भावाचा घात झाल्याची घटना तालुक्यातील केळझर येथे  घडली. 

पोलिस स्टेशन मूल हद्दीतील केळझर येथील सुनिल राजाराम मानकर (४0) याला दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरी येणे व आई व भावाला शिवीगाळ करून मारहाण करणे. हे त्याचे नित्याचे काम, काल संध्याकाळी ६ वाजताचे सुमारास नेहमी प्रमाणे सुनील हा दारू पिऊन घरी गेला आणि कारण नसतांना वाद उकरून काढून आईला शिवीगाळ करू लागला. दरम्यान घरी असलेला लहान भाऊ सुभाष राजाम मानकर (३८) याने मोठा भाऊ सुनील याला विनाकारण शिवीगाळ करू नको असे समजावत खोली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या कारणावरून सुनील आणि सुभाषमध्ये शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वाद विकोपाला जाऊन हातापाईवर पोहोचला, दरम्यान मोठा भाऊ सुनील याने लहान भाऊ सुभाषला जिवंत मारतो असे म्हणत घरात ठेवलेली लोखंडी सळाख हातात घेतली. सळाख घेऊन सुभाषवर वार करण्याचा प्रयत्न करीत असतांना सुभाषने सुनीलचा प्रतिकार केला. सुनीलच्या हातामधून सळाख खेचत असतांना झालेल्या झटापटीत राग अनावर झालेल्या सुभाषने सुनीलच्या हातातल्या सळाखीने सुनीललाच मारहाण केली. परीणामी दारूडा सुनील जागीच गतप्राण झाला. सदर घटनेची माहिती मूल पोलिसांना होताच ठाणेदार सतिशसिंह राजपूत आणि सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे सहकार्यांसह केळझर येथील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या प्रत्यक्ष पाहणी नंतर आई गिरीजाबाई मानकर (६0) हीच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेऊन लहान भाऊ सुभाष याला ताब्यात घेतले. तपासाअंती सुभाष मानकर याला मोठय़ा भावाची हत्या केल्याचे कारणावरून अटक केली. पुढील तपास ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे, सहकारी गिरीश नागापुरे याच्या सहकार्याने करीत आहे.