कोरची तालुक्यात पोलिसांचा अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध अँक्शन प्लॅन

March 04,2021

गडचिरोली : ४ मार्च कोरची तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभाग व मुक्तिपथने संयुक्तरित्या अँक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार कोरची पोलिसांनी टेकाबेदड नदी परिसरात शोधमोहीम राबवून ५ क्विंटल मोहसडवा, २५ लिटर दारू व साहित्य नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 

जिल्ह्यात अवैध दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी अँक्शन प्लॅननुसार कृती करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कोरची पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करून तालुक्यातील अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. यात त्रासदायक गावांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार टेकाबेदड नदी परिसरात अवैध दारू अड्डे असल्याची माहिती पोलीस विभागास प्राप्त झाली. पोलीस पथकाने शोधमोहीम राबवून विविध अड्डे उध्वस्त केले. घटनास्थळावरून दारू विक्रेते फरार झाले. पोलिसांनी ५ क्विंटल मोहसडवा, २५ लिटर दारू व दारू गाळण्याचे साहित्य नष्ट केले आहे.