अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थची आणखी एक दर्जेदार कामगिरी

March 04,2021

नागपूर : ४ मार्च - अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थने आपल्या यशामध्ये आणखी एका दर्जेदार कामगिरीची नोंद केली आहे. मुंबईत राईड अँक्रॉस इंडिया सहा हजार किमी सायकल मोहीम देशातील गोल्डन क्वाड्रिलॅटरलवर पूर्ण केली. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी डॉ. समर्थला अवघे १३ दिवस ९ तास व ५६ मिनिटाचा कालावधी लागला. 

डॉ. समर्थने जगातील सर्वांत लांब अंतराची रेस ऍक्रोस  अमेरिका व ट्रान्स सायबेरियन एस्ट्रीम पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. ६ हजार किमीचे अंतर पूर्ण केले असली तरी उंच, सखल मार्ग, शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील सीमेवर ट्रॅफिक जाम व देशातील काही भागात खराब वातावरणाचा फटकाही यावेळी बसला. त्यामुळे १३ दिवसाचा कालावधी या मोहिमेसाठी लागला. या संपूर्ण प्रवासाबद्दल रोटरीने दिलेल्या सहकार्याबद्दल रोटरी क्लबचे आभारही त्याने मानले. 

या मोहिमेचा उद्देश डॉ. प्रकाश आमटे यांचा प्रकल्प लोक बिरादरीसाठी निधी संकलनाचा होता. मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडियापासून या मोहिमेची सुरुवात डॉ. समर्थने केली होती. या स्थानावर मोहिमेचा समारोप करण्यात आला. या मोहिमेत डॉ. समर्थ यांच्यासोबत जितेंद्र नायक, आनंद फिसके, मुकल समर्थ, राज महाडिक, आरुषी नायक, रवींद्र परांजपे, अश्विन मोकाशी, भावेश पात्रे, डॉ. श्रीहास बर्दापूरकर, अरहाम शेख, अनिरुद्ध पंड्या आदींचा समावेश होता.