तीस लाखाची खंडणी मागण्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

March 04,2021

नागपूर : ४ मार्च - बारा लाख रुपयाच्या व्याजापोटी २८ लाख रुपये वसूल करूनही ३० लाखांची खंडणी मागितली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. धर्मेद्र खुशलानी, रा. खामला, दिवाकर कोतुलवार, रा. बेसा अशी खंडणी मागणाऱ्यांची  नावे आहेत. 

समर्थनगर निवासी फिर्यादी नितीन गौर (४५) हे मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यांना व्यवसायाकरीता पैशाची आवश्यकता होती. धर्मेद्र आणि दिवाकर हे त्यांच्या ओळखीचे आहेत. ते व्याजाने पैसे देतात म्हणून त्यांनी २०१९ मध्ये दोघांकडून १० टक्के दरमहा व्याजाने १२ लाख रुपये घेतले. १२ लाख रुपयांच्या व्याज दरमहा १ लाख २० हजार रुपये दिवाकरला द्यायचे. 

दरम्यान कोरोना संकटात टाळेबंदीमुळे नितीनचा  मासेमारीचा व्यवसाय ठप्प झाला. त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली. त्यामुळे दरमहा ते व्याज देण्यास असमर्थ ठरले. व्याजाचे हप्ते थांबल्यामुळे धर्मेद्र आणि दिवाकर यांनी फिर्यादीला पाहुन घेण्याची तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे फिर्यादी घाबरले. मात्र, आर्थिक स्थितीत सुधार होत नसल्याने ते व्याजाची रक्कम देण्यास ते हतबल होते. जून २०२० मध्ये धर्मेद्र आणि दिवाकर दोघेही फिर्यादीच्या घरी पोहोचले. त्यांच्या खिशातील जबरीने इनोव्हा कारची चाबी हिसकली आणि निघून गेले. याप्रकारानंतरही फिर्यादी शांत होते. फिर्यादीने १२ लाखाच्या बदल्यात आतापर्यंत २८ लाख रुपये दिले आहेत.

यानंतरही धर्मेद्र आणि दिवाकरचे पोटभरे नाही. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी दिवाकर याने फिर्यादीला फोनवर धमकी दिली. २८ लाख रुपये घेतल्यानंतरही ३० लाखांची खंडणीची मागणी केली. भयभीत झालेल्या फिर्यादीने सोनेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.