घरफोडीच्या गुन्ह्यात ४४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला नागपूर पोलिसांनी केली अटक

March 04,2021

नागपूर : ४ मार्च - घरफोडीच्या गुन्ह्य़ात ४४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात विशेष पोलिस पथकाला यश आले आहे. लक्ष्मण शामराव बोबडे (वय ६२) असे आरोपीचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, १८ वर्षाचा असताना लक्ष्मण बोबडे याने घरफोडी केली होती. त्याच्यावर अंबाझरी पोलिस ठाण्यात १९७७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. न्यायालयाने त्याला अटक करण्याचे आदेश जारी केले होते. विशेष शोध पथकाने लक्ष्मण बोबडे याचा शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयाकडून तो राहत असलेल्या आवारी चौक, विदर्भ बुनियादी शाळेच्या समोर, वकीलपेठ, येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने फार वर्षांपूर्वी त्याने व त्याचा सहआरोपी मित्र नारायण शंकर यादवराव नेवारे व अशोक केशवरा टेकाम यांच्यासोबत गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यात अंबाझरी पोलिसांनी अटक केली होती. आरोपी लक्ष्मण बोबडेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सहआरोपी अशोक केशवराव टेकाम याचा सुध्दा शोध घेतला असता त्याची बहीण कमलाबाई टेकाम रा. वकीलपेठ तो १९९९ मध्ये मरण पावल्याचे सांगितले. आरोपी लक्ष्मण बोबडे याला पुढील कार्यवाहीकरिता. ३ मार्च रोजी अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.