१३ तृतीयपंथी व्यक्तींची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती

March 04,2021

रायपूर : ४ मार्च - छत्तीसगड पोलिस प्रशासनाने सामाजिक दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल उचलले असून, प्रशासनातर्फे ४ जिल्ह्यांमध्ये १३ तृतीयपंथी व्यक्तींची कॉन्स्टेबलपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  छत्तीसगड कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. 

प्राप्त माहितीनुसार, ९ जणांची नियुक्ती रायपूरमधून करण्यात आली आहे. या परीक्षेस रायपूरमधून २० जण बसले होते. राज्यात प्रथमच पोलिस विभागात तृतीयपंथीयांची भरती झाली आहे. मला त्यांचे वैयक्तिकरीत्या अभिनंदन करायला आवडेल, अशा भावना पोलिस महासंचालकांनी व्यक्त केल्या. छत्तीसगडव्यतिरिक्त आजवर केवळ राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका तृतीयपंथी व्यक्तीची पोलिस विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच बिहार पोलिस प्रशासनानेदेखील आपल्या पोलिस यंत्रणेमध्ये तृतीयपंथीयांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडमध्ये नियुक्त करण्यात आलेले उमेदवार आपल्या नियुक्तीवर आनंदी असून, मिळालेल्या संधीचे आम्ही सोने करू, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली तृतीयपंथी समुदायाला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली होती आणि राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांवर त्यांना समान हक्क असल्याचा निर्वाळा दिला होता.