अमेरिकेतील फ्रिडम हाऊसने स्वातंत्र्यासंदर्भात भारताच्या मानांकनामध्ये केली कपात

March 04,2021

नवी दिल्ली : ४ मार्च - अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने स्वातंत्र्यासंदर्भात भारताच्या मानांकनामध्ये कपात केली. भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र वरुन अंशत: स्वतंत्रवर आणण्यात आला आहे. नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य हे २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने म्हटलं आहे. खास करुन मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने करोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतातील स्वातंत्र्यावर गदा आल्याचं फ्रीडम हाऊसने नमूद केलं आहे.

स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला देण्यात आलेले गुण हे ७१ वरुन कमी करुन ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे. फ्रीडम हाऊसने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये, “मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणाऱ्या संस्थावर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जाणकार  आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचाही समावेश आहे. स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखीन घसरण झाली. त्यानंतर २०२० साली ज्या पद्धतीने भारत सरकारने करोनाची परिस्थिती हाताळली त्यादरम्यान मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालं,” असं नमूद करण्यात आलं आहे.

फ्रिडम हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये भारतातील परिस्थितीसंदर्भात भाष्य केलं आहे. “देशातील हिंदू राष्ट्रवादी सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वाढत्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर  समर्थन करण्यात आलं. तसेच मुस्लीम लोकसंख्येला बाधा पोहचवणाऱ्या विषमता निर्माण करणारे धोरणं लागू करण्यात आली. तसेच प्रसारमाध्यमे, वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ, नागरिक हक्कांसाठी लढणारे गट आणि आंदोलकांचे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आली,” असं  फ्रिडम हाऊसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

भारताला ६७ गुण मिळाल्याने भारत आता स्वातंत्र्याच्या बाबतीत इक्वाडोअर आणि डॉमनिक रिपब्लिकच्या बरोबरीने आहे. फ्रीडम हाऊसने भारतामधील स्वातंत्र्याच्या दर्जा हा, ‘पूर्ण स्वतंत्र’ वरुन ‘अंशत: स्वतंत्र’वर आणला आहे. भारताचे मानांकन घटल्यामुळे, “याचा अर्थ देशातील २० टक्क्यांहून कमी लोकसंख्या सध्या स्वतंत्र देशांमध्ये राहते. हा आकडा १९९५ नंतरचा सर्वात कमी आकडा आहे,” असं फ्रिडम हाऊसने म्हटलं आहे.

जगामध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून फिनलॅण्ड, नॉर्वे, स्वीडन हे पहिल्या स्थानी आहेत. तर सर्वात कमी स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये तिबेट आणि सिरियाचा समावेश आहे.