आता २४ तास कोरोना लसीकरण उपलब्ध होणार - केन्द्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

March 04,2021

नवी दिल्ली : ४ मार्च - दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या दोन दिवसांत राज्यासह देशात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी, अँपमधील गोंधळामुळे उन्हा-तान्हात ताटकळत राहणारे लाभार्थी असे चित्र दिसून आले. त्यावरील उपाय तसेच मोहिमेस गती आणण्यासाठी केंद्राने करोना लसीकरणावरील कालनिर्बंध  उठविले. लाभार्थीना अडचणीविना लस मिळावी तसेच मोहिमेचा वेग वाढावा म्हणून लसीकरण चोवीस तास उपलब्ध होईल, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांना आरोग्याचे मूल्य जास्त वाटते, त्यामुळे आता देशातील लोकांना कुठल्याही वेळी लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे, असे हर्ष वर्धन यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

लशीची दुसरी मात्रा १३ मार्चपासून सुरू होणार असून ज्यांनी पहिली मात्रा घेऊन २८ दिवस झाले असतील त्यांना त्या दिवशी मात्रा दिली जाईल. करोनायोद्धय़ांचे लसीकरण २ फेब्रुवारीला सुरू करण्यात आले होते. कोविड १९ लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला असून ६० वर्षांवरील तसेच ४५ वर्षांवरील व्यक्तींना सहव्याधी असल्यास लस दिली जाणार आहे.

लाभार्थीना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लस देण्यात येईल. जर रुग्णालयाची क्षमता असेल तर पाच वाजल्यानंतरही लस देण्याचे काम करता येईल.