हिम्मत असेल तर राममंदिरावर विधिमंडळात चर्चा घ्या - देवेंद्र फडणवीसांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

March 04,2021

मुंबई : ४ मार्च - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून यावेली राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत अशी विचारणा केली. प्रभू श्रीरामाने यांना कंत्राट  दिलं आहे का ? असा सवाल विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन संताप व्यक्त करताना हिंमत असेल तर राम मंदिरावर चर्चा लावा असं आव्हानच देऊन टाकलं.

नेमकं काय झालं? 

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उभे राहिले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी नटसम्राट म्हणून त्यांचा उल्लेख करुन दिल्याची आठवण करुन दिली. तसंच आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार ज्या ऑगस्ट क्रांती मैदानात घेतला तेथील स्तंभावर कमळाचं चिन्ह असून मी त्याला सॅल्यूट केलं असं त्यांनी सांगितलं. आता पंजाचा वापर होतो म्हणून ते कापून ठेवणार आहात का? अशी विचारणा त्यांनी केल्यानंतर विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावर नाना पटोले यांनी तुम्हाला मिरची का लागते? असं विचारत मला बोलू द्या असं म्हणत संताप व्यक्त केला. व्यत्यय कशाला आणता? अशी विचारणाही त्यांनी केली.

आशिष शेलार यांची हरकत

यानंतर आशिष शेलार हरकत घेत बोलण्यासाठी उभे राहिले. “नाना पटोले वरिष्ठ सदस्य आहेत. मंत्री असल्याप्रमाणे ते खुलासा देत आहेत. त्यांना तो अधिकार दिला आहे का हे स्पष्ट करावं. आम्ही तुमच्याकडे वेळ द्या अशी मागणी केली असता सदस्यांना राग येण्याचा काय संबंध आहे,” अशी विचारणा त्यांनी केली.

नाना पटोले संतापले

यानंतर नाना पटोले यांनी सभागृहात सत्तापक्ष बोलायला उभं राहिल्यानंतर यांनी गोंधळ घालायचा अशी काही परंपरा सुरु झाली आहे का? आम्हाला बोलू द्या…अजिबात चालणार नाही यांची मनमानी अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, “मी तीन वर्ष भाजपात होतो याचा उल्लेख केला. यामध्ये काय लपलेलं आहे. तुमचे व्यवहार मला कळले, रात्री राजीनामा दिला पोटनिवडणूक झाली आणि त्यात आमचा खासदार निवडून आला. कोणाच्या भरवशावर कोण होतं हे राज्यातील जनतेला माहिती आहे. याचा उल्लेख करण्याची गरज नाही”.

प्रभू श्रीरामाने यांना टोलवसुलीचं कंत्राट दिलं आहे का? 

“माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाची एक व्यक्ती आली होती. यावेळी त्याने भगवान श्रीरामाच्या नावे मंदिरासाठी पैसे मागितले जात असून मी दिले नाही तर धमकावलं जात असल्याचं सांगितलं. अशा कोणत्या निधी कायद्यांतर्गंत हे पैसे गोळा करत आहेत. रामाने यांना टोलवसुलीचं कंत्राट दिलं आहे का? याचं उत्तर पाहिजे. रामाच्या नावाने पैसा गोळा करणारे हे कोण?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केला.

फडणवीसांचा संताप

यावरुन संतापलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरावर चर्चा सुरु आहे का? तसं असेल तर स्वतंत्र चर्चा लावा. ज्यांना खंडणी गोळा करण्याची सवय आहे त्यांना समर्पण कळणार नाही. असेल हिंमत तर चर्चा लावा काही अडचण नाही अशा शब्दांत संताप व्यक्त केला. यावेळी सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.