व्ही. के. शशिकला यांनी राजकारण सोडले

March 04,2021

चेन्नई : ४ मार्च - एआयएडीएमकेच्या माजी नेत्या व्ही. के. शशिकला यांनी राजकारणाला निरोप दिला आहे. सामाजिक जीवनातून आपण निवृत्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी आज (बुधवार) याबाबत घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या सर्व समर्थकांचे आभार मानले. तसेच, एआयएडीएमके पक्षातील सदस्यांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये डीएमकेचा पराभव करा, असेही त्यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना म्हटले.

आपल्या दोन पानी पत्रामध्ये त्या म्हणाल्या, की मी कधीही सत्तेची वा पदाची आस ठेवली नाही. 'अम्मांचे' (जयललिता) समर्थन करणाऱ्या सर्वांचे सध्या एकच उद्दिष्ट असायला हवे, ते म्हणजे डीएमकेचा पराभव. अम्मांचे सरकार येईल, आणि राज्यात सुवर्णकाळ परतावा यासाठी आपण प्रार्थना करत राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या जनतेचेही आभार मानले.

एएमएमके सध्या मागच्या दाराने इतर पक्षांशी युतीबाबत चर्चा करत आहे. त्यातच शशिकलांनी अशा प्रकारे आवाहन केल्यामुळे, इपीएसच्या नेतृत्त्वामधील एआयएडीएमके तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा सत्ता काबीज करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.