कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर बडतर्फ

March 04,2021

औरंगाबाद : ४ मार्च - औरंगाबाद शहरातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने महिला रुग्णाकडून शरीर सुखाची मागणी करत बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. त्यानंतर त्या डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारावई करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद महापालिका हद्दीतील दवाखान्यात एका महिलेवर डॉक्टरकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गंभीर आहे, याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु महिलेवर बलात्कार झालेला नाही. प्राथमिक चौकशी करून त्या डॉक्टरला बडतर्फ केले आहे. तरीही वरिष्ठांकडून याची सखोल चौकशी केली जाईल. या महिलेचे नाव बाहेर न येता लवकरच संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन सबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच सर्व कोविड सेंटरसाठी ३१ मार्चच्या आत एसओपी जाहीर केली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले. 

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा कामकाज सुरुवात होण्याआधी औरंगाबाद मधीलनघटनेच उल्लेख करत ही घटना गंभीर असून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप केला होता. 

औरंगाबाद मधिल पदंपुरा येथे कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी एक महिला दाखल झाली होती. उपचार पूर्ण करण्यासाठी महिलेला दहा दिवस कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र आठ दिवसानंतर तिला तिची तब्येत चांगली वाटू लागली. त्यामुळे संबंधित महिलेने डॉक्टरांकडे आपल्याला डिस्चार्ज मिळावा, अशी मागणी केली. मात्र दोन दिवस आधी डिस्चार्ज मिळण्यासाठी शरीर सुखाची मागणी डॉक्टराने त्या महिला रुग्णाकडे केली. हा सगळा प्रकार महिलेने आपल्या घरी सांगितल्यानंतर सदर घटना समोर आली. 

रुग्णालयातून घरी सोडण्यासाठी डॉक्टरने महिलेकडे शरीरसुखाची मागणीकेल्याची माहिती पीडित महिलेच्या नातेवाईकांना समजताच ते संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये येऊन संबंधित डॉक्टरला मारहाण केली.