नागपूरकरांना मिळणार दोन शिफ्टमध्ये लस

March 05,2021

नागपूर : ५ मार्च - नागपूर शहरात कोव्हिड-१९ लसीकरण मोहीम सुरू झालेली असून दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ वर्षांवरील गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या व्यक्तींचे लासीकरण सुरू आहे. कमी कालावधीत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी दिवसाकाठी दोन शिफ्टमध्ये १४ तास लसीकरण व्हावे यादृष्टीने मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी लसीकरण केंद्र आणि कार्यासनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने लसीकरण केंद्र असलेल्या संबंधित कार्यासनाचे अधिनस्त कार्यरत शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची सेवा लसीकरण मोहिमेकरिता सकाळी ८ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री १० अशा दोन शिफ्टमध्ये आवश्यकतेनुसार ड्युटी लावण्यात यावी, लाभार्थींचे लसकीरण नोंदणीकरिता होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने प्रत्येक लसीकरण केंद्रावर हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर नोंदणी, ऑनलाईन नोंदणी आणि स्पॉट नोंदणी असे तीन स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात यावे. याकरिता तीन स्वतंत्र संगणक, लॅपटॉप, टॅबची व्यवस्था करण्यात यावी, लाभार्थींना सहज समजेल असे सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावे, सुरक्षा रक्षकांच्या मार्फत गर्दीवर नियंत्रणाकरिता अनुषंगिक उपाययोजना करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांकरिता बसण्याची विशेष व्यवस्था यासह पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था असावी, कोव्हिड संदर्भातील निकष आणि दिशानिर्देशांच्या अंमलबजावणीकरिता यथोचित उपाययोजनांचे आपल्या स्तरावर नियोजन करावे, असे आदेशात म्हटले आहे.