विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोडा टाकण्याचा तीन दरोडेखोरांचा प्रयत्न फसला

March 08,2021

भंडारा : ८ मार्च - विदर्भ कोकण ग्रामीण बँक परसोडी/नाग शाखेत तीन अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बँकेत रोख रक्कम न मिळाल्याने दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. दरम्यान यावेळी चोरटे 10 हजार रुपये किमतीचे इंटरनेट साहित्य घेऊन पसार झाले. ही घटना पहाटे ३ वाजता सुमारास घडली. लाखांदुर तालुक्यातील परसोडी/नाग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे सर्व कर्मचारी ६ ला बँक बंद करून गेल्यानंतर मध्यरात्री १२ ते ३ वाजताच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या हेतूने बँकेची खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. लाँकरसह सर्वञ शोधाशोध केली माञ बँकेत रोख रक्कम आढळून न आल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला.

दरम्यान बँकेत कार्यरत यंत्रणेच्या माध्यमातून राञी बँकेत काही जण घुसल्याचे संदेश बँकेच्या कर्मचाऱ्यांना गेले. त्यामुळे शिपाई पदावर कार्यरत भावेश हटवार यांना बँकेत जाऊन पाहण्यास सांगितले. भावेश यांनी सकाळी ८ वाजता सुमारास बँकेत जाऊन पाहिले असता, बँकेची खिडकी तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. सीसीटीव्हीमध्ये चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेले तीन अज्ञात चोरटे खिडकी तोडून घुसल्याचे दिसत असल्याचे समजते. चोरट्यांना बँकेत रोख रक्कम न मिळाल्याने त्यांनी बँकेतील इंटरनेट कनेक्शनचे दहा हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.