घ्या समजून राजे हो.....विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका हाच महाराष्ट्रातील राजकीय अस्थैर्यावरील एकमेव उपाय

April 02,2021

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या खूपच अस्थिर असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्तारुढ असलेल्या महाआघाडी सरकारवर विरोधक रोज नवे नवे आरोप करत आहे. या आरोपांना तोंड देणे सत्ताधार्‍यांना कठीण होत चालले आहे. विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी जोरदार मागणी केलेली आहे. त्याचबरोबर महाआघाडीतील तीनही घटकपक्षांमध्ये प्रचंड कुरबुरी सुरु असून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. अशा परिस्थितीत तिघांपैकी कुणीतरी एक पक्ष सरकारमधून बाहेर पडेल आणि सरकार कोसळेल अशीही भाकिते वर्तविली जात आहेत. त्यासाठी राजकीय ज्योतिषी वेगवेगळे मुहूर्तही काढून देत आहेत. एकूणच आजचा दिवर सरला उद्याचे काय? हा प्रश्‍न प्रत्येकाला भेडसावतो आहे.

आज या लेखात याच सर्व शक्यतांचा आणि पुढत्या पर्यायांचा विचार करायचा आहे. राज्यातील सध्याच्या आघाडी सरकारला कारभार सांभाळणे कठीण होते आहे त्यामुळे रोज नवनवी प्रकरणे पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत राज्यपाल महोदय केंद्रीय गृहमंत्रालयाला महाराष्ट्रातातील विद्यमान सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी अशी शिफारस करू शकतात.  मात्र राजकीय जाणकारांच्या मतांनुसार 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत राज्यपाल महोदय अशी कोणतीही शिफरस करणार नाही आणि केली तरी गृहमंत्रालय त्यावर कोणतीही कारवाई करणार नाही हे निश्‍चित. यामागे कारण असे की, आताच महाराष्ट्र सरकार बरखास्त केले तर केंद्र सरकार राज्यांमधील विरोधकांची सरकारे पाडते किंंवा फोडते असा संदेश जाईल आणि निवडणुका होणार्‍या 5 राज्यामध्ये विरोधकांना प्रचारासाठी आयतेच कोलीत मिळेल अशी भिती केंद्र सरकारच्या मनात निश्‍चितीच असणार. त्यामुळे आजपासून किमान महिनाभर तरी  हे सरकार बरखास्त होणार नाही हे निश्‍चित. मात्र 2 मे 2021 रोजी 5 राज्यांचे निकाल जाहीर झाल्यावर बरखास्तीच्या हालचालींना निश्तिच वेग येऊ शकतो. त्यामुळेच काय कालच एका राजकीय पंडिताने 15 मे रोजी महाराष्ट्रात सत्ता बदल होणार असे छातीठोकपणे सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पापांचा घडा भरला तर हे सरकार बरखास्त केले जाईल ही जशी शक्यता आहे तसेच या तीनही सत्ताधारी पक्षातून काही आमदार फोडून हे सरकार पाडले जाण्याचा प्रयत्नही होऊ शकतो, आज तीनही पक्षांमध्ये असंतुष्टांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील सुमारे 45-50 आमदार फोडले तर विद्यमान सरकार पडू शकते आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप या फुटीरांच्या मदतीने सत्तेत येऊ शकतो.  मात्र विद्यमान कायद्यांनुसार या फुटीर आमदारांची आमदारकी रद्द होईल आणि त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. या निवडणूकीत हे सर्व आमदार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपवर असेल ते साधले तर ठीक नाहीतर पुन्हा सरकार अस्थिरतेच्या वाटेवर जाणार हे निश्‍चित.

महाआघाडीतील तसा कच्चा लिंबू म्हणून ओळखला जाणारा काँग्रेसपक्ष ही सध्या नाराज आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष देखील या सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर महाआघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या आठवड्यात उचललेल्या काही कथित पावलांमुळे राष्ट्रवादी कांँग्रेस या सरकारमधून बाहेर पडणार आणि भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करणार अशीही जोरदार चर्चा सुरु आहे. जर असे काहीच घडले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल आणि कोणतेही नवीन सूत्र पुढे आले नाही तर राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका हे निश्‍चित आहे. त्यातही कुणी राजकीय पंडित दिवाळी 2021 तर कुणी राजकीय पंडित मार्च 2022 ला मध्यावधी निवडणूका निश्‍चित असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता सरकार अस्थिर आहे हे निश्‍चित आहे.

या पार्श्‍वभूमीवर सरकार बरखास्त झाले किंवा एखाद्या पक्षाने पाठिंबा काढला तर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपलाच जुळवाजुळव करण्यासाठी पुढे यावे लागेल. सध्या आधी नमूद केल्याप्रमाणे भाजप आणि राष्ट्रवादी कांग्रेस एकत्र येण्याच्या शक्यता बोलल्या जात आहे. राष्ट्रवादी कांँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एक अनाकलनीय व्यक्तिमत्व आहे. ते कोणत्यावेळी कोणती खेळी खेळतील हे कोणालाही सांगता येणार नाही. मात्र सद्यःस्थितीत अनिल देशमुखांच्या 100  कोटींची खंडणी आणि पोलिस बदल्यांचा व्यापार या दोन कथित प्रकरणांमुळे राष्ट्रवादी कांँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे. त्यामुळे पवार भाजप सोबत जाण्याचा प्रस्ताव पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तेव्हापासून या शक्यतेलाही बळ मिळाले आहे.

या परिस्थितीत कदाचित सत्तेसाठी भाजप राष्ट्रवादी कांँग्रेसशी हातमिळवू शकतो मात्र ते भाजपच्या दृष्टीने भविष्यकालीन अडचणी निर्माण करणारे ठरू शकेल ही जाणीव भाजप नेतृत्ववाने ठेवायला हवी. राष्ट्रवादी कांँग्रेसच्या  मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. यातील अनेक आरोपांप्रकरणात भाजपनेच वेळोवेळी टिकेची झोड उठवली आहे. अशावेळी अशा आरोप असणार्‍या व्यक्तिंबरोबर भाजपने सरकार बनवले तर भाजपचे अनेक समर्थक दुखावू शकतील हे निश्‍चित आहे तरीही भाजपने हे केले तर पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या अनेक कृत्यांची पावती भाजपच्या नावे फाडली जाईल विरोधकांना ते आयते कोलित मिळेल. ते भाजपला परवडणारे ठरणार नाही. शिवाय शरद पवार हे आधी म्हटल्याप्रमाणे अनाकलनीय व्यक्तिमत्व आहे. ते या सरकारला कितीकाळ जीवदान देतील आणि कोणत्या क्षणी पाठिंबा काढून घेत सरकार आडवे पाडतील हे साक्षात परमेश्‍वरालाही सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत भाजपने राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार बनवणे हे अनाठायी धाडस ठरू शकेल याची जाणीव भाजप नेतृत्वाने ठेवणे गरजेचे आहे.

दुसरी शक्यता म्हणजे भाजप आणि काँग्रेसने एकत्र येणे आणि सरकार बनवणे ही ठरू शकते. मात्र याक्षणीतरी ती अशक्यप्राय गोष्ट आहे याचे प्रमुख कारण म्हणजे या दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकदमच परस्पर विरोधी आहेत त्यामुळे ही शक्यता देखील अशक्य या कोटीतीलच मानवी लागेल.

आधी नमूद केल्याप्रमाणे 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर सत्ताधारी आघाडीतील तीनही पक्षातील काही आमदार बाहेर पडून भाजपसोबत किंवा भाजपातच येऊ शकतात मात्र फेरनिवडणुकांमध्ये हे तीन पक्ष एकत्र आले तर तेही भाजपला अडचणीचे ठरू शकेल हा धोकाही लक्षात घ्यायला हवा.

या परिस्थितीत सरकारच नव्हे तर विधानसभाच बरखास्त करून फेरनिवडणूका घेणे आणि राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणे हा एकमेव पर्याय हा व्यवहार्य ठरतो. राज्यातील सर्व 288 विधानसभा क्षेत्रांसाठी एकदम निवडणुका झाल्या तर राज्यातील चारही प्रमुख पक्षांची खरी ताकद काय ते लक्षात येऊ शकेल. 2019 साली सत्तेसाठी भिन्न विचारधारा असतांनाही निवडणूक निकालानंतर  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिघे एकत्र आले. मध्यावधी निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येणे याक्षणी तरी अशक्य आहेत. त्याचबरोबर महाआघाडीतील तीन पक्षही कितपत एकत्र लढतील याबाबत सर्वच सांशक आहेत. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी महापालिकेसह सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली आहे. राष्ट्रवादीचीही हीच मानसिकता आहे त्यामुळे सर्वच मतदार संघांमध्ये चौरंगी लढती होणार हे निश्‍चित आहे. त्यातच 2019 मध्ये सत्तेसाठी भिन्न विचारधाराशी तडजोड केल्यामुळे  शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार बराच नाराज आहे. त्याचा फटका सेनेला बसणार हे निश्‍चित. यासर्व पार्श्‍वभूमीवर जर शिस्तबद्धपद्धतीने रणनीती आखून प्रयत्न केल्यास भाजप राज्यात स्वबळावर सरकार बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल अशी चिन्हे आजतरी दिसत आहेत.

हे सर्व मुद्दे लक्षात घेता राज्यातील राजकीय अस्थैर्य असेच कायम राहिले तर विधानसभा भंग करून फेरनिवडणुकांना सामोरे जाणे हा एकमेव पर्याय राज्याला पुन्हा स्थिरतेकडे नेणारा ठरू शकतो असे एक राजकीय अभ्यासक म्हणून माझे मत आहे. जाणकारांनी, अभ्यासकांनी आणि राजकीय विश्‍लेषकांनी यावर विचारमंथन करावे हीच अपेक्षा आहे.

 

  तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क.ः घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/इश्रेससशीर्ईंळपरीहझरींहरज्ञ या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

 

                             -अविनाश पाठक