कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही- संजय राऊत

April 08,2021

मुंबईः ८ एप्रिल - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे पत्र समोर आले आहेत. सचिन वाझे यांनी पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या आरोपांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सचिन वाझे यांनी आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर संजय राऊत यांनीही कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही. असं म्हणत अनिल परब यांची बाजू सावरली आहे. 

'महाराष्ट्रा सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. ज्यात जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,' असं म्हणत राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

'यामध्ये अनिल परब यांचं नाव आलं आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचं नावं आलं आहे. गुन्हा केल्यानं अटकेत असलेल्या आरोपींकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझ्या त्यांच्यावर विश्वास आहे,' असंही संजय राऊत यांनी नमूद केलं आहे.