दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी होत आहेत उघड

April 16,2021

अमरावती : १६ एप्रिल - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीसमोर आता तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या छळकथांसोबतच वनविभागातील अनेक कथित नियमबाह्य़ कामांची जंत्री उघड होऊ लागली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अपहार झाल्याची चर्चा सुरू होती, आता कर्मचाऱ्यांच्या लेखी जबाबातून देखील त्याचे सूतोवाच झाल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर येथील कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यासाठी तत्कालीन क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्याकडून अनेक निर्णय लादले गेल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी वनाधिकाऱ्यांच्या नऊ सदस्यीय समितीने गेल्या काही दिवसांत परतवाडा, चिखलदरा, हरिसाल येथील विश्रामगृह निसर्ग निर्वाचन संकुलात अधिकारी- कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. यात एम.एस. रेड्डी व  विनोद शिवकुमार याने कर्मचाऱ्यांचा कशा पद्धतीने छळ चालवला होता, याविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. जंगलातील नुकसानभरपाई कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीतून केली जात असल्याचा प्रकारही चौकशीदरम्यान उघड झाला आहे. आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की, जंगलाचे नुकसान भरायचे, असा सवालही काही कर्मचाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येते.
आत्महत्या प्रकरणात १५ मुद्यांवर चौकशीसाठी आलेल्या तपासणी समितीसमोर वनविभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अनेक धक्कादायक बाबी मांडल्या आहेत. त्यात नागपूर येथील एका कंपनीला ७० लाख रुपयांचा जीएसटी माफ करण्याचे आश्वासन आपल्यापुढे दिल्याचे एका कर्मचाऱ्याने लेखी दिले. ३० ते ३५ टक्के कमी दराने कामे नागपूर येथील कंत्राटदाराने मेळघाटात केली. केलेल्या कामावर ७० लाख रुपये जीएसटी कपात करण्यात आली. चिखलदरा दौऱ्यावर आलेल्या एम.एस. रेड्डीने विश्रामगृहावर कंत्राटदाराला तडजोड करून देण्याचे त्याचवेळी आश्वासन दिले, तेथील हा सर्व प्रकार उपस्थित एका कर्मचाऱ्याने समितीला सांगितला.
अकोट वन्यजीव विभागातील कोकटू परिसरात दस्तूरखुद्द वनाधिकाऱ्यांसह कुणालाही जाण्यासाठी वन बलप्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. तसा शासनाचा अत्यंत कठोर नियम आहे. विनापरवाना आढळून आल्यास गुन्हे नोंदवले जातात. हे अतिसंरक्षित क्षेत्र वाघांचे अधिवास क्षेत्र आहे. एका कंत्राटदाराचा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चांगलाच दबदबा आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित कुठल्याही परिसरात तो वाहनाने रात्री-अपरात्री फिरतो. त्याला कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही. कोकटू भागात सर्वाना प्रवेश निषिद्ध आहे. असे असताना हा कं त्राटदार  वाटेल तेव्हा फिरतो. त्याचीही या प्रकरणात चौकशी व्हावी, अशी मागणी वनकर्मचाऱ्यांनी के ली आहे.