अकोल्यात साकारणार प्राणवायूचा नवा प्रकल्प - पालकमंत्री बच्चू कडूंची योजना

April 16,2021

अकोला : १६ एप्रिल - कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही ,याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी तसेच प्राणवायूची कमतरता पडू नये, यासाठी हवेतून प्राणवायू घेऊन त्याचा रुग्णांकरिता उपयोग करणारा प्रकल्प अकोल्यात साकारणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. त्याबाबत प्रशासकीय मान्यता देऊन पुढील 15 ते 20 दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावात रुग्णांकरिता प्राणवायूचा तुटवडा होऊ नये याकरिता विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यात प्राणवायू पुरवणार्या कंपन्यांची अडचण होऊन प्राणवायूचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता यावेळी व्यक्त केल्या गेली. भविष्यात प्राणवायूची अडचण होऊ नये याकरिता आढावा बैठकीत एका कंपनीच्या प्रतिनिधीने हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे सादरीकरण केले. पालकमंत्र्यांनी या सादरीकरणाला जिल्ह्यात मूर्तरुप देण्याची निश्चिती करून त्याला प्रशासकीय मान्यता देण्याची सूचना केली. त्यानंतर जिल्ह्यात हा अभिनव प्रकल्प साकारल्या जाणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना पालकमंत्र्यांनी दिली असून हा प्रकल्प शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात उभारल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला प्रकल्प असल्याचाही दावा पालकमंत्र्यांनी केला.