साडेचार लाख टन कोळशाची चोरी - वडेट्टीवारांनी दिले चौकशीचे आदेश

July 20,2021

चंद्रपूर: २० जुलै- कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) अंतर्गत बरांज खुली कोळसा खाण येथील साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी, असे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बरांज खुली कोळसा खाण संदर्भात कामगारांच्या समस्या तसेच बरांज गावातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आढावा घेण्यात आला.  बरांज खुली कोळसा खाणीतील साडेचार लाख टन कोळसा २०१८पूर्वी गायब झाला आहे, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले, हा कोळसा जाळण्यात आला असेल, तर त्याची राख लोकांच्या नजरेस पडायला पाहिजे होती. तसेच स्थानिकांना याबाबत माहिती असती. मात्र याबाबत सर्व जण अनभीज्ञ असून यात मोठे गौडबंगाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. बरांजचा कोळसा अवैधरित्या उचलण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने प्रशासनाने याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पुनर्वसन विभागाचे उप जिल्हाधिकारी जे.पी.लोंढे, विशाल दुधे आदी उपस्थित होते.