अमेरिकेतील वैदेही डोंगरे ‘मिस इंडिया यूएसए’

July 21,2021

मिशीगन: २१ जुलै- अमेरिकेतील मिशीगन येथील वैदेही डोंगरे या पंचवीस वर्षांच्या विद्यार्थिनीस मिस इंडिया यूएसए २०२१ किताबाने गौरवण्यात आले आहे. जॉर्जियाची आर्शी लालानी ही दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. डोंगरे ही मिशीगन विद्यापीठातून पदवीधर झालेली असून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. ती एका नामांकित कंपनीत व्यवसाय विकास व्यवस्थापक  आहे.  महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच साक्षरता यावर भर देण्यासाठी आपण या स्पर्धेत भाग घेतला, असे तिने सांगितले. तिला कथकमधील चमकदार कामगिरीसाठी मिस टॅलेंटेड पुरस्कार मिळाला होता.

लालानी (वय २०) हिनेही चांगली कामगिरी केली असून तिने दुसरा क्रमांक मिळवला. मेंदूत गाठ असूनही तिने हे यश मिळवले आहे. उत्तर कॅरोलिनातील मीरा कासारी हिला तिसरा क्रमांक मिळाला. १९९७ मधील मिस वर्ल्ड  डायना हेडेन या प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या. तीस राज्यांतील ६१ जण या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी यापूर्वी मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए, मिस टीन इंडिया यूएसए स्पर्धांत भाग घेतला होता. या तीनही गटांतील विजेत्यांना मुंबईच्या प्रवासाची तिकिटे मोफत देण्यात आली आहेत.