हेरगिरी प्रकरणी लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांचा गोंधळ, कागदपत्रांची फेकाफेक

July 28,2021

नवी दिल्ली : २८ जुलै- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस होता. दरम्यान आज दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालत संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे दिसून आले. प्रचंड गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज १२.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी कागदपत्र फाडून फेकाफेक करत, घोषणाबाजी देखील केली. तसेच, 'खेला होबे', असे नारेदेखील  देण्यात आले. पेगॅसस, कोरोना आदी मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तर, काँग्रेससह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्याची व दबाव निर्माण करण्याची रणनिती आखली आहे.
पेगॅसस हेरगिरी प्रकरणानरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान व गृहमंत्र्यांना जाब विचारत आहे. तर, सरकारचे म्हणणे आहे की विरोधकांची सभागृहाचे कामकाज चालू देण्याची किंवा चर्चा करण्याची इच्छा नाही. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधींनी सांगितले की, पेगॅसस हेरगिरी प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, याप्रकरणी १४ पक्षांकडून नोटीस दिली जाईल.