“रुग्णालयामध्ये २०-२५ लोकांनी मला पकडून…”; एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या नितीन देशमुखांनी सांगितला घटनाक्रम

June 22,2022

शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरत गाठले होते. त्यांच्यासोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख होते. त्यानंतर नितीन देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुन्हा नितीन देशमुख पुन्हा सुरत येथील हॉटेलमध्ये परतले होते. त्यानंतर नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली होती. आमदार नितीन देशमुख यांच्यावर काहीतरी दबाव आणला जात असेल, म्हणूनच ते परत येऊ शकत नाही आहेत, असा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला होता. यानंतर आता नितीन देशमुख आता नागपूर विमानतळावर परतले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना नितीन देशमुख यांनी मी उद्धव ठाकरेंसोबत आहे असे म्हटले आहे.

“माझी तब्येत व्यवस्थित आहे. काल गुजरातमधल्या पोलिसांनी मला जबरदस्तीने हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते. मला कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराचा झटका आला नव्हता. पण त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. रुग्णालयामध्ये गेल्यावर २०-२५ लोकांनी मला पकडून माझ्या दंडामध्ये जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते कोणते होते हे मला माहिती नव्हते. पण माझ्या शरीरावर चुकीची प्रक्रिया करण्याचे षडयंत्र त्या लोकांचे होते,” असा खुलासा नितीन देशमुख यांनी केला.

“मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आमच्या मंत्र्यासोबत मी सोबत गेलो तो पण उद्धव ठाकरेंसोबत आहेत. मी माझ्या घरी चाललो आहे. रात्री १२ वाजता हॉटेलमधून मी निघालो होतो आणि रात्री ३ वाजता रस्त्यावर उभा होतो. पण १०० ते २०० पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिले नाही. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि तिथे मला हृदयविकाराचा झटका आल्याचे नाटक रचण्यात आले. पण देवाच्या कृपेने आज मी व्यवस्थित आहे,” असे नितीन देशमुख यांनी म्हटल.