मोठा खुलासा! शरद पवारांनाही भेटीची वेळ देत नव्हते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; चार ते पाच महिन्यांपूर्वीच पवारांनी…

June 22,2022

महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेल्या राजकीय बंडामुळे नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झालेली असतानाच या संघर्षाची चाहूल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काही महिन्यांपूर्वीच लागली होती. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील नेत्यांमध्ये वाढणारी अस्वस्थता आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांमधील नाराजीची कल्पना देतानाच बंड होऊ शकतं असेही संकेत दिले होते. राजकीय सुत्रांनी यासंदर्भातील माहिती ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिलीय. केवळ स्वपक्षीय नेतेच नाही तर सरकारमधील मंत्री आणि थेट महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनाही उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ द्यायचे नाहीत अशी माहिती समोर आलीय.

“शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना चार ते पाच महिन्यांआधीच यासंदर्भातील इशारा दिला होता. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांच्या तसेच माहाविकास आघाडीमधील अन्य नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात करावी असा सल्ला पवारांनी दिला होता,” अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचणं, त्यांच्याशी संवाद साधणं अडचणीचं होत असल्याची जाणीव पवारांना झाली होती. “त्यांनी उद्धव ठाकरेंना संभाव्य बंडासंदर्भातील इशाराही दिला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी त्याकडे फार लक्ष दिलं नाही,” असं सुत्रांनी म्हटलंय.

सुत्रांच्या माहितीनुसार, काही प्रसंगी शरद पवारांनाही उद्धव ठाकरेंनी भेटीची वेळ दिली नव्हती. “शरद पवार हे मुख्यमंत्री उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यावरुन नाराज होते. उद्धव ठाकरे हे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याबद्दल त्यांची नाराजी होती,” असं सुत्रांनी म्हटलंय.

याच प्रकरणाशी संबंधित अन्य सुत्रांनी, “उद्धव ठाकरे नियमितपणे संवाद साधत नसल्याने शरद पवारांनी त्यांना इशारा दिला होता. त्यांनी शिवसेनेत यामुळे संघर्ष होतील असे संकेत ठाकरेंच्या निकटवर्तीयांना दिले होते,” असंही सांगितलं. “महाविकास आघाडीच्या काही आमदारांनी शरद पवारांकडे यासंदर्भात चर्चा करताना मुख्यमंत्री आमचं म्हणणं ऐकून घेत नाही तसेच त्यांच्याशी संवाद साधणं कठीण असल्याचं सांगितलं होतं. यामुळेच त्यांना एकटं आणि सरकारला आपली गरज नसल्यासारखं वाटतं होतं,” असंही सुत्रांनी सांगितले.

उद्धव ठाकरे भेटत नसल्यासंदर्भातील तक्रार काँग्रेसच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी किमान दोनवेळा थेट दिल्ली हायमांडकडे केली होती, अशी माहिती काँग्रेस नेत्याने दिलीय. “कधी कधी तर आमच्या कॅबिनेट मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा सल्ला हवा असायचा. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून भेटीसाठी वेळ मिळणं जवळजवळ अशक्यच होऊन बसलेलं,” असं काँग्रेस नेत्याने सांगितलं.

महत्त्वाच्या निर्णयांवर सल्लामसलत करण्यात उद्धव ठाकरेंना सातत्याने अपयश येत असल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकासआघाडीमधील तीन महत्वाच्या पक्षांबरोबरच छोटे पक्ष आणि अपक्षांनीही यासंदर्भातील नाराजी व्यक्त केलेली. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या छोट्या पक्षाच्या आमदारानेही मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करताना, “मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ४५ वेळा फोन केला. मात्र कोणीही मला प्रतिसाद दिला नाही,” असं सांगितलं. याच आमदाराने अशाप्रकारे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांबद्दल भूमिका घेतल्याने त्यांचा संताप वाढला आणि त्यामुळेच त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेपासून स्वत:ला दूर सारले, असं म्हटलंय.

यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अशाप्रकारच्या आमदारांच्या तक्रारी असल्याची कल्पना नाही असं म्हटलंय. उद्धव ठाकरे हे नेहमी बैठका घेतात आणि आमदारांच्या तसेच मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा या पदाधिकाऱ्याने केला. “करोना आणि आरोग्यासंदर्भातील तक्रारी असतानाही मुख्यमंत्री नेहमी सक्रीय असते. ते लोकांना व्हिडीओ कॉलवरुन संपर्क साधायचे,” असं या पदाधिकाऱ्याने सांगितलं.