नृत्‍य, नाट्याच्‍या माध्‍यमातून साजरा झाला ‘जश्‍न आजादी का’

August 16,2022

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सव आणि स्‍वातंत्र्य दिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर एकीकडे संपूर्ण देशभरात देशभक्‍तीचे वातावरण तयार झालेले असताना नागपुरातदेखील दीडशे विद्यार्थ्‍यांनी नृत्‍य, गीत व नाटकाच्‍या माध्‍यमातून ‘जश्‍न आजादी का’ साजरा केला.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्‍था असलेल्‍या बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्यावतीने स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्सवानिमित्त ‘जश्न आझादी का’ हा देशभक्तीपर कार्यक्रम शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात घेण्‍यात आला. मंचावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्‍या नागपूर शाखेचे माजी अध्‍यक्ष प्रमोद भुसारी, दंदे हॉस्पिटलचे डॉ. पिनाक दंदे, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष आभा मेघे व संयोजक रुपाली मोरे यांची उपस्थिती होती.
डॉ. पिनाक दंदे यांनी बालरंगभूमी परिषदेने नाट्य परिषदेच्‍या या उपक्रमाचे कौतूक केले. स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍ताने विविध शाळांतील दीडशे विद्यार्थ्‍यांनी सादर केलेल्‍या या कार्यक्रमातून देशभक्‍तीचा भाव निर्माण झाला असल्‍याचे ते म्हणाले. प्रमोद भुसारी यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्‍छा दिल्‍या व बालरंगभूमीने असे मुलांना संस्‍कारक्षम करणारे उपक्रम वर्षभर राबवावे, असे आवाहन केले. आभा मेघे यांनी कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले.

देशाला परकियांच्‍या गुलामगिरीतून मुक्‍त करण्‍यासाठी ज्‍या लाखो-करोडो लोकांनी आपल्या जीवाचे बलीदान दिलेल्‍या सर्वांना ‘जश्‍न आजादी का’ या नृत्‍य, नाट्य, गायन आदी कलांच्‍या सादरीकरणातून मानवंदना देण्‍यात आली. ‘मेरे देश की धरती’ या गाण्यातून विद्यार्थ्‍यांनी सुखी संपन्न भारताचे चित्र एकीकडे उभे केले तर दुसरीकडे इंग्रजांनी देशवासियांवर कसे अत्‍याचार केले याचेही प्रकटीकरण करण्‍यात आले. इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्‍यासाठी आद्यक्रांतीकारक मंगल पांडे, मर्दानी झाशीची राणी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग-सुखदेव-राजगुरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्‍यांदी सर्वांनी केलेल्‍या प्रयत्‍नांना छोटे छोटे नाटयप्रसंग, तेरी मिट्टी में मिल जावा, रंग दे बसंत, कदम कदम बढाये जा सारखी गीते आणि ने मजसी ने या यासारख्‍या गीतावरील नृत्‍याच्‍या माध्‍यमातून प्रस्‍तुत करण्‍यात आले. महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्‍यांनी हाती तिरंगा घेत वंदे मातरम् सादर करीत स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा केला तेव्‍हा सभागृह भारावून गेले.

एसओएस बेलतरोडी, वानाडोंगरी, हुडकेश्‍वर व अत्रे लेआऊट, पं. बच्‍छराज व्‍यास, नवरंग क्रिएशन्‍स, सोमलवार निकालस, ज्‍येष्‍ठ नागरिक मंडळ यांचा यात सहभाग होता. या कार्यक्रमाची संहिता नितीन नायगावकर यांची होती तर दिग्‍दर्शन व संयोजन रुपाली मोरे यांनी केले होते. सहदिग्दर्शक अभिषेक बेलरवार, संगीत संयोजक डॉ. अनिल कवडे व गौरव टांकसाळे, ध्‍वनी व्‍यवस्‍था एकनाथ व प्रकाशयोजनेची बाजू किशोर बत्तासे यांनी अतिशय उत्‍तमरित्‍या सांभाळली.