आदित्य ठाकरे बिहारमध्ये जाऊन तेजस्वी यादवांना का भेटणार; शिंदे गटाच्या 'चाणक्याने' सांगितला प्लॅन

November 23,2022

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची (ठाकरे गट) पडझड रोखण्यासाठी पायाला भिंगरी लावून राज्यभरात फिरत असलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बुधवारी बिहारच्या एकदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते लालूप्रसाद यादव यांचे पूत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या अनपेक्षित बिहार दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काही अंदाज वर्तविले आहेत. ते मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Aaditya Thackeray in Bihar).

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती. या सर्व प्रकरणाची सूत्रे नरेश म्हस्के यांच्याकडून हलवण्यात आल्याची चर्चा होती. जितेंद्र आव्हाड यांनीही एक चाणक्य पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. आव्हाड यांच्या या वक्तव्याचा रोख नरेश म्हस्के यांच्या दिशेने असल्याचे बोलले जात होते. याच नरेश म्हस्के यांनी आता आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावर शरसंधान साधले आहे. मुंबईत उत्तर भारतीय विशेषत: बिहारी नागरिकांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बिहारी समाजाची मते आपल्याला मिळावीत, यासाठी आदित्य ठाकरे यांनी बिहारचा दौरा काढला असावा, अशी शक्यता नरेश म्हस्के यांनी वर्तविली.

एकनाथ शिंदे साहेबांसोबत बाळासाहेबांच्या विचाराला मांडणारा मतदार आला आहे. ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींनी ठाकरे गटाची साथ सोडली. तसेच बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या मतदारांनीही त्यांची साथ सोडली आहे. तेजस्वी यादव यांचे पिताश्री लालू प्रसाद यादव यांनी कायमच शिवसेनेला विरोध केला. ते नेहमी बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात बोलायचे. आता हीच लोकं आदित्य ठाकरे यांना जवळची वाटत आहेत. खरंतर तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत आले पाहिजे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधानांना भेटण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते. मग आता आदित्य ठाकरे स्वत:हून परराज्यातील उपमुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहेत. त्यांच्यावर काय वेळ आली आहे. कदाचित आदित्य ठाकरे यांचा दौरा बिहारमध्ये एखादे पेंग्विन पार्क काढण्यासाठी असेल, अशी खोचक टिप्पणीही नरेश म्हस्के यांनी केली.

कसा असेल आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा?

आदित्य ठाकरे हे बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जातील. बिहारची राजधानी पाटणा येथे ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई तसंच शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि इतर काही प्रमुख पदाधिकारीही आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असतील.

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही हजेरी लावली होती. देशातील हुकूमशाही राजवटीविरोधात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची भूमिका तेव्हा आदित्य यांनी मांडली होती. आता ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार असल्याने भविष्यात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट दिसणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.