परदेशी भगिनींनी केली रामटेकची सायकल सफर

November 25,2022

नागपूर : रामटेकच्‍या परिसरातील निसर्ग सौंदर्य, गडम‍ंदिर, प्राचीन वास्‍तुकला, हेरिटेज साईट्स, आदिवासी, मोगरकसाचे जंगल परदेशी पर्यटकांना आकर्षिक करू लागले आहे. नुकत्‍याच अमेरिकेतून आलेल्‍या दोन परदेशी भगिनींनी रामटेकची सायकल सफर केली आणि येथील निसर्ग पर्यटनाचा आनंद घेतला.

न्‍यूजर्सी येथून आलेल्‍या ली या 62 वर्षाच्‍या असून व्‍हर्जिनियाची येथून आलेल्‍या जेन यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. ते पहिल्‍यांदाच मध्‍य भारतात पर्यटनासाठी आल्‍या असून त्‍यादरम्‍यान त्‍यांनी दोन दिवस रामटेक येथील कॅम्‍प चेरी फार्ममध्‍ये वास्‍तव्‍य केले. 

या दोन दिवसांच्‍या वास्‍तव्‍यात त्‍यांनी रामटेक परिसराची सायकल सफर केली. रामटेक येथील लोकजीवन, त्‍यांची संस्‍कृती, परंपरा, राहणीमान, खानपान जाणून घेतले व परिसरात नागरिकांची संवाद साधला. निसर्गात रमणा-या या दोन सख्‍या बहिणींनी सायकल सफारी करत मोगरकसा जंगल, परिसरात आदिवासी गावांना भेटी दिल्‍या. खिंडसी बॅकवॉटर, ब्‍लॅक बक ट्रेल आणि भाताच्‍या शेतांमध्‍येही या दोघी बहिणी गेल्‍या. परिसरातील पाणवठ्यांवर त्‍यांनी स्‍थलांतरीत पक्षांच्‍या निरीक्षणाचाही आनंद घेतला. याशिवाय त्‍यांनी गडमंदिरात जाऊन आरतीदेखील केली. 

रामटेकचा परिसर अतिशय सुंदर असून आम्‍ही दोघींनाही खूप आवडला आहे. आम्‍ही परत एकदा या परिसराला भेट देऊ, अशी इच्‍छा ली व जेन यांनी व्‍यक्‍त केली. त्‍यांनी अनिल जयस्‍वाल, सचिन पालकर, रोहित द्विवेदी व अमोल खंते यांनी उत्‍कृष्‍ट मार्गदर्शन केल्‍याबद्दल त्‍यांचे आभार मानले.