एलआयटीचा जागतिक माजी विद्यार्थी मेळावा 24 व 25 डिसेंबर रोजी

December 08,2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार

नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भाचे लौकिक असलेल्या लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) चा जागतिक माजी विद्यार्थी मेळावा (ग्‍लोबल अॅल्‍युमनी मीट - 2022) येत्या 24 व 25 डिसेंबर रोजी आयोजत करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार असून राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची विशेष उपस्‍थ‍िती राहील. 

‘एक स्वप्न, एक टीम’ या संकल्पनेवर आधारित या ग्लोबल अॅल्युमनी मीट - 2022 चा मुख्‍य उद्देश एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (LITAA) च्‍या माध्‍यमातून सक्रिय व समर्पित माजी विद्यार्थी नेटवर्क तयार करणे, हा आहे. दोन दिवसांच्या कार्यक्रमात औपचारिक उद्घाटन, लिटाअरोमा, ऑरगॅनिक इंडिया आणि फायर चॅट सेंटर ऑफ एक्सलन्स, ज्वेल ऑफ एलआयटी आणि यूथ आयकॉन ऑफ एलआयटी पुरस्कार, ‘लिटा संवाद’ या विशेषांकाचे प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फेलोशिप डिनर यांचा समावेश असेल.

एलआयटी संस्थेची स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल होत असताना या नव्‍या प्रवासामध्‍ये माजी विद्यार्थ्‍यांचाही सक्रीय सहभाग असावा आणि संस्‍थेला सर्व क्षेत्रात अधिक वैभव प्राप्त करण्याच्‍या दिशेने नेण्‍यासाठी माजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित  करण्‍याच्‍या उद्देशाने या ग्‍लोबल मीटचे आयोजन करण्‍यात आले आहे. नागपूर, मुंबई, उत्तर(दिल्ली) पुणे, दक्षिण(बेंगळुरू) तसेच यूएसए, युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व येथील सर्व लिटा चॅप्टरचे या उपक्रमासाठी सहकार्य मिळत असून समर्थन प्राप्‍त होत आहे. या जागतिक स्तरावरील माजी विद्यार्थ्‍यांच्‍या मेळाव्‍यातील सहभागींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. 

यासंदर्भातील अधिक माहितीसाठी globallitalumni@gmail.com  वर मेल करावा किंवा कार्यक्रम प्रमुख रमेश तराळे (+91 76786 11820) आणि श्रीकांत गुडधे (+91 76786 11820) यांच्याशी संपर्क साधावा. 

एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (LITAA) 

एलआयटी ही संस्‍था 1942 साली स्‍थापन झाली असून तेव्‍हापासून 6000 हून अधिक रासायनिक अभियंते आणि तंत्रज्ञ या संस्‍थेतून तयार झाले आहेत. संस्‍थेच्‍या माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, संशोधन, उद्योग आणि सार्वजनिक सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यात सातत्य दिसून येत आहे. अनेक एलआयटीयन्‍सनी अनुकरणीय यश संपादन केले असून नवनिर्मिती आणि वैचारिक नेतृत्व देत भारताला गौरव प्राप्त करून दिला आहे. 

अनेक एलआयटीयसन्‍स भारतातील अग्रणी उद्योग क्षेत्रामध्‍ये तसेच, आंतरदेशीय कॉर्पोरेट कंपन्‍यांमध्ये उच्च व्यवस्थापन पदांवर कार्यरत असून धोरणकर्त्‍यांची भूमिका निभावत आहेत. त्‍यांनी अनेक पुरस्कारप्राप्त प्रक्रिया तसेच, तंत्रज्ञान विकसित केले असून अनेक नवोदित अभियंते घडवले आहेत. सार्वजनिक सेवांद्वारे नागरिकांचे जीवन समृद्ध करण्‍याचा प्रयत्‍न केला असून परफॉर्मिंग आर्ट्स आणि सर्जनशीलतेच्‍या क्षेत्रातही एलआयटीयन्‍सने भरीव का‍मगिरी केली आहे. 

एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेने एलआयटी या आघाडीच्‍या संस्थेतील सर्व माजी विद्यार्थ्यांना एका छताखाली आणले आहे. जगभरातील सर्व एलआयटीयन्‍सची ही एक स्वावलंबी व स्वतंत्र संस्था असून त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची साक्ष देणारी आहे. 

मागील सहा वर्षांमध्ये, एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेने ने एलआयटी मध्ये अनेक प्रकल्प राबवले आहेत ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

पायाभूत सुविधांचा विकास किंवा आधुनिकीकरण संशोधन किंवा शैक्षणिक उपकरणे जसे की पायलट प्लांट आणि इन्‍क्‍युबेशन सेंटर.

शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट आदी विद्यार्थी कल्याण उपक्रम.

सन 2016, 2017, 2018 आणि 2021 मध्‍ये पार पडलेल्‍या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्याला मोठे यश मिळाले असून एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेची सक्रिय सदस्यता जवळपास 2700 पर्यंत वाढविण्यास त्‍यामुळे मदत झाली आहे.

एलआयटीबद्दल 

एलआयटीने 2016-17 मध्ये प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली. स्वर्गीय राव बहादूर डी. लक्ष्मीनारायण यांनी दूरदृष्टी ठेऊन "प्रगत उपयोजित रसायनशास्त्राचे शिक्षण देणारी" संस्था स्थापन करण्यासाठी वर्ष 1932 मध्ये आपल्या आयुष्यभराची संपूर्ण पूंजी अर्थात 100 एकर जमीन आणि 30 लक्ष रुपयांचे दान केले होते. 

संस्थेने 1942 मध्ये कार्य सुरू केले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, नवनवीनन अभ्यासक्रम जोडण्‍यात आले. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्रांतीशी जुळवून घेत एलआयटीने स्वतःला अद्ययावत ठेवले आहे. एलआयटी ही यूडीसीटी (आता आयसीटी), मुंबई यांसारख्या समवयस्क आयआयटी, आरईसी इ.संस्थांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था बनली आहे.