पोषण आहाराचा छुपा खजिना भारताकडे : श्री अन्न अधिवेशनातला सूर

February 15,2023

मनुष्याला जडणाऱ्या 80 टक्के आजारांचे मूळ हे gआहारात दडले आहे, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. शेतीतल्या रसायनयुक्त खतांमुळे मानवी आरोग्याच्या समस्यांचा गुंता गंभीर होत आहे. मात्र मानवी शरिराला पोषक ठरणाऱ्या पोषण आहाराची क्षमता भरडधान्यात आहे, हे देखील जगाने मान्य केले आहे. जगाला जे भरडधान्य पुरविले जाते, त्यात भारताचा वाटा 20 टक्के आहे. आगामी काळात या भरडधान्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर जगाला पोषण आहार पुरविणाऱ्या भारताकडे छुपा खजिना दडला आहे, असा सूर बुधवारी येथे उमटला. 


निमित्त होते, दोन दिवस श्री अन्न अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राचे. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रसायनशास्त्र इंजिनिअरिंग विभाग आणि राष्ट्रीय महिला, बाल आणि युवा विकास विभागाच्यावतीने व्हिएनआयटीच्या प्रांगणात ही अन्न परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कल्याण मंत्रालयाचे ह्यात सक्रिय सहभाग आहे. 

 

व्हिएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर हैदराबाद येथील भरडधान्य विकास संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके, व्हिएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंगे विभाग अध्यक्ष डॉ. सचिन मांडवगणे, युसीडचे राजेश मालविय, कापूस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे, कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. डी. बी. ठाकरे, सातारा येथील विजय मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.


भरडधान्याच्या बाबतीत भारताच्या क्षमतेवर प्रकाश टाकताना डॉ. वाघमारे म्हणाले, देशातील 375 लाख हेक्टर क्षेत्रफळावर भरडधान्याचे उत्पादन घेतले जाते. जगामध्ये यात भारताचा सर्वाधिक 20 टक्के वाटा आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याने आपण येत्या 20 वर्षांत जगाला पोषणयुक्त भरडधान्य पुरविणारा कोठार असलेला देश बनू शकतो. 


अध्यक्षीय समारोपात व्हिएनआयटीचे संचालक डॉ. पडोळे म्हणाले, शिक्षित अशिक्षीत ही व्याख्या पुस्तकी ज्ञानावर ठरत नसते तर ती जमीनीशी असलेल्या नात्यावरून ठरते. परंपरागत शेतीला सोशल इंजिनिअरिंगची जोड देणे ही काळाची गरज झाली आहे. पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना वाढिस लावण्यासाठी वेगवेगळ्या शाखेतील तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. डॉ इप्सिता चक्रवर्ती यांनी सूत्रसंचालन केले तर रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनुपमा कुमार यांनी आभार मानले. 


सचिन मांडवगणे म्हणाले, केमिकल इंजिनिअरिंग विभागात मिलेट पासून वेल्यू एडेडेड फ़ूड प्रोसेसिंग प्रॉडक्ट्स बनवले आहें. विभाग मिलेट प्रोटीन वर काम करते आहे. 

भरडधान्य शास्त्रज्ञ डॉ. चापके म्हणाले, शरिराचे संपूर्ण पोषण करण्याची क्षमता भरडधान्यातच आहे. भरडधान्याची चव तरुणांच्या जीभेवर रुजविण्याचे काम गृहिणींनी केले पाहिजे, तरच पिढी सदृढ आणि निरोगी होईल. 


केंद्र सरकारकडून सप्तसूत्री कार्यक्रम

भरडधान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारने सप्तसूत्री मिशन हाती घेतल्याचे सांगत मालविय म्हणाले, भरडधान्याच्या देशी वाणांचे संशोधन, लूप्त होणारे भरडधान्य संवर्धन, बीज बँक, वितरण साखळी, मार्केटिंग, दलाल साखळी खंडीत करणे, स्टार्टअपला प्रोत्साहन हा सप्तसूत्री मिशनचा धागा आहे. त्या माध्यमातून देशभर भरडधान्य बीज बँक साखळी तयार केली जात आहे.