सिव्हिल20 इंडिया प्रारंभिक बैठकीला नागपूरमध्ये आज पासून सुरुवात

March 20,2023

नागपूर : भावी काळ हा कोणा एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसेल तर जे सहकार्य करतील आणि एकमेकांमध्ये मिसळतील त्यांचा असेल आणि प्रत्येकाने समावेशकतेच्या सार्वत्रिक नियमाचे पालन केलेच पाहिजे, असे प्रतिपादन सिव्हील20 इंडियाच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी देवी यांनी केले आहे. त्या आज सोमवार ला नागपूर येथे या बैठकीच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. माता अमृतानंदमयी देवी आणि नोबेल पारितोषिक विजेते आणि सत्यार्थी फाऊंडेशनचे संस्थापक कैलाश सत्यार्थी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि सिव्हिल20 इंडिया 2023च्या सचिवालयाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. विनय सहस्रबुद्धे, सिव्हिल20 इंडिया 2023चे शेर्पा आणि माजी राजदूत विजय नंबियार, सिव्हिल20 इंडोनेशियाचे अहमद माफतुचन, सिव्हील20 चे ट्रॉयका सदस्य आणि ब्राझिलच्या गेस्टोसचे अलेसांद्र निलो आणि कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांचा प्रमुख पाहुण्यांमध्ये समावेश होता.

या कार्यक्रमात बोलताना सिव्हिल20 इंडियाच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी देवी म्हणाल्या की जगातील लोकांना सध्या दोन प्रकारच्या गरिबीची समस्या भेडसावत आहे- त्यातील पहिला प्रकार म्हणजे अन्न आणि निवाऱ्याची गरिबी आणि दुसरा प्रकार म्हणजे प्रेम आणि जिव्हाळ्याची गरिबी. प्रेम आणि जिव्हाळाच्या मूल्यांची जोपासना करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. विविधतेची निकोप सरमिसळ मानवी संस्कृतीची भरभराट होण्यासाठी अतिशय गरजेची आहे, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे ज्यामुळे प्रचंड मोठे परिवर्तन घडवले जात आहे, असे अमृतानंदमयी देवी यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरात आलेले सर्व पाहुणे आणि प्रतिनिधींचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी20 चे लोकशाहीकरण झाले आहे, असे ते म्हणाले. ही आता एक लोकचळवळ बनली आहे. सरकारकडे कायदेशीर अधिकार असतात मात्र नागरी समाजाकडे नैतिक अधिकार असल्याने नागरी समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.नागरी समाजाची एक भक्कम प्रणाली असण्याची गरज आहे जेणेकरून शेवटच्या माणसाचा आवाज सरकार ऐकू शकेल, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभिक परिषदेला  357 प्रतिनिधी उपस्थित आहेत अशी माहिती डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी  दिली. सी -20 प्रारंभिक बैठकीसाठी  26 देशांचे प्रतिनिधी आणि 130 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी नागपुरात आले आहेत. यावेळी सहस्रबुद्धे यांनी सिव्हिल 20 इंडियाच्या  सचिवालयाच्या कार्याचा अहवाल सादर केला.

सहभागी आणि सदस्यांचे स्वागत करताना, सिव्हिल 20 इंडिया 2023 चे शेर्पा विजय नांबियार म्हणाले की, सिव्हिल 20 इंडिया 2023 प्रारंभिक परिषद ही नागरी समाजाला एकत्र आणण्यासाठीची एक  बैठक आहे. नागरी संस्था  शासनाचा भक्कम आधार आहेत, आणि यापुढेही राहतील, असे ते म्हणाले. नागरी संस्था सर्व अडथळे पार करून  काम करू शकतात तसेच  सरकार आणि जनता यांच्यातील दुवा  म्हणून काम करू शकतात.

भारतामध्ये मध्यान्ह भोजन कार्यक्रम आणि बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम सारखे जगातील काही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा  कार्यक्रम आहेत असे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यावेळी बोलताना म्हणाले.  जी 20 अध्यक्षतेअंतर्गत  भारताने दक्षिणेकडील देशांच्या  अधिक प्रभावी प्रतिनिधित्वासाठी आवाज उठवला पाहिजे. तसेच भारताने जगात करुणेची भावना रुजावी यासाठी देखील नेतृत्व केले पाहिजे असे कैलाश सत्यार्थी म्हणाले .

अहमद मफ्तुचान यांनी नागपुरात सुरुवातीची बैठक आयोजित केल्याबद्दल सिव्हिल 20 इंडिया प्रेसिडेंसी 2023 चे अभिनंदन केले. नागरी संस्थांच्या  नेत्यांनी जी 20 बरोबर त्यांचा सहभाग अधिक  मजबूत करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

अलेसांड्रा निलो म्हणाल्या की, आजच्या जगात नागरी संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आधुनिक समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सिव्हिल 20 अथक प्रयत्न करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

सिव्हिल 20 इंडिया  2023 चे उप -शेर्पा स्वदेश सिंग यांनी आभार मानले. ते म्हणाले की, सिव्हिल 20 इंडिया यु आर राईट हे घोषवाक्य सिव्हिल 20 इंडिया  2023 प्रारंभिक परिषदेच्या रूपाने साकार झाले.