वैदर्भीय व्यंजने, जुगलबंदी अन् पारंपरिक नृत्य

March 20,2023

जी-२० पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि 'गाला डीनर'चे आयोजन

नागपूर :  वैदर्भीय व्यंजने, जुगलबंदी आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम आज जी -20 अंतर्गत सी - 20 परिषदेसाठी आलेल्या देशी-विदेशी पाहुण्यांना पाहायला मिळाला. तेलंगखेडी येथील गार्डनमध्ये दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे तर नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गाला डिनरचे आयोजन करण्यात आले.

गाला डिनरच्या पूर्वी मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात बासरी, सितार, व्हायोलिन, संतूर आणि तबला यांची जुगलबंदी वैदर्भीय कलाकारांनी सादर केली. अरविंद उपाध्ये यांनी बासरी, शिरीष भालेराव (व्हायोलिन), वात्मिक धांडे ( संतूर )अवनींद्रा शेओलिकर (सितार), संदेश पोपटकर यांनी तबल्याची जुगलबंदी सादर केली. 

जुगलबंदीनंतर विदर्भाची लोकधारा या कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत गोंधळ, लावणी, सादर करण्यात आले. यवतमाळ येथील डॉ. राहुल हळदे आणि त्यांच्या चमूने गोंधळ आणि लावणी सादर केली. तर सुरेश घोरे आणि त्यांच्या चमूने चितकोर हे नृत्य सादर केले. शहनाई वादन विज्ञानेश्वर खडसे यांनी केले.

गाला डिनरचे आयोजन नागपूर सुधार प्रन्यासमार्फत करण्यात आले. यात वैदर्भीय खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. यात धिरडे, ज्वारी भाकरी , बाजरी भाकरी, पुरणपोळी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थांची  तसेच बटाटा वडा, पनीर टिक्का,  चिली चिकन, पाटवडी रस्सा, फिश करी, मसाला भात, पायसम या वैदर्भीय खाद्यपदार्थांची चव मान्यवरांना चाखायला मिळाली. यासोबतच मान्यवरांसाठी अनेक देशी विदेशी खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते.

 सी 20 परिषदेच्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी, सी 20 आयोजन समितीचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी,  नासुप्रचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह देश विदेशातील पाहुणे आदी यावेळी उपस्थित होते.

 सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या गाला डिनरचे संपूर्ण नियोजन केले होते. सजवलेली भारतीय बैठक आणि चौरंगावर वाढलेल्या ताटामध्ये सुग्रास जेवणाचा बेत लक्षवेधी होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.