रात्रभर झाली संगीतामृताची बरसात : विद्यार्थी व संगीतप्रेमींनी घेतला मनमुराद आनंद

June 04,2023

नागपूर : भारत सरकारच्‍या सांस्‍कृतिक मंत्रालयाचा ‘आझादी का अमृत महोत्‍सव’, जी20 इंडिया आणि स्पिक मॅके यांच्‍या संयुक्‍तवतीने व्‍हीएनआयटीमध्‍ये सुरू असलेल्‍या 8 व्‍या आंतरराष्‍ट्रीय अधिवेशनाच्‍या समारोपाच्‍या दिवशी ‘श्रुती अमृत’ या रात्रकालीन संगीत सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. उद्घाटनानंतर रात्री साडेदहाच्‍या सुमारास सुरू झालेल्‍या या कार्यक्रमात संगीत क्षेत्रात गुरूस्‍थानी असलेल्‍या गायक, वादकांच्‍या संगीतामृताची बरसात झाली. या संगीत मैफिलीचा नागपूरकरच्‍या चोखंदळ रसिकांनी तसेच विद्यार्थी, स्‍वयंसेवकांनी मनमुराद आनंद लुटला. 

या रात्रकालीन मैफ‍िलीची सुरुवात पद्मविभूषण विद्वान उमयालपुरम के. शिवरामन यांच्‍या कर्नाटक मृदंगम वादनाने झाली. तत्‍पूर्वी नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते के. शिवरामन यांच्‍यासह टी. हरिहरन, चेतन किन्‍हीकर या कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यानंतर के. शिवरामन यांच्‍या मृदंगम वादनाला प्रारंभ झाला. त्‍यांनी आपल्‍या वादनाने रसिकांच्‍या मनाचा ठाव घेतला. 

पद्मश्री पं. उल्‍हास कशाळकर यांच्‍या शास्‍त्रीय गायनाचा आस्‍वाद घेण्‍यासाठी नागपुरातील संगीत क्षेत्रातील अनेक मान्‍यवरांनी हजेरी लावली होती. रात्रीच्‍या चंद्राच्‍या शीतल प्रकाशात पं. उल्‍हास कशाळकर यांचे गायन रसिकांना अमृतमयी आनंद देऊन गेले. त्‍यानंतर पद्मश्री विदुषी ए. कन्‍याकुमारी यांचे कर्नाटक व्‍हायोलिन वादन झाले. व्‍हायोलिनच्‍या नाजुक तारांवर लिलया फिरणारी त्‍यांची बोटे रसिकांच्‍या अंतर्मनात सुमधूर ध्‍वनी निर्माण करून गेली तर पद्म भूषण पं. साजन मिश्रा यांच्‍या हिंदुस्‍तानी गायकीने रात्र तरुण होत गेली. हैद्राबादी ब्रदर्स विद्वान डी. सेशा चारी यांच्‍या कर्नाटक गायकीने रात्रीचा नूर पालटला. पद्मश्री उस्‍ताद एफ. वसीफुद्दीन डागर यांच्‍या गायकीने पहाटेच्‍या पहिल्‍या प्रहरी संगीत श्रवणाची अद्वितीय अनुभूती रसिकांना मिळवून दिली. 

देशभरातून आलेल्‍या प्रतिनिधींचा ‘हेरिटेज टूर’ 

भारत सरकारच्‍या सांस्‍कृतिक मंत्रालयाचा ‘आझादी का अमृत महोत्‍सव’, जी20 इंडिया आणि स्पिक मॅके यांच्‍या संयुक्‍तवतीने व्‍हीएनआयटीमध्‍ये सुरू असलेल्‍या 8 व्‍या आंतरराष्‍ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातून सुमारे 1500 विद्यार्थी व स्‍वयंसेवक आले होते. या प्रतिनिधींना विदर्भातील पर्यटन स्‍थळांना भेटी देण्‍याची संधी ‘हेरिटेज टूर’च्‍या माध्‍यमातून देण्‍यात आली. रात्रकालीन संगीत सभा पार पडल्‍यानंतर 10 बसेस व्‍हीएनआयटीमधून सकाळी 9 वाजता ‘हेरिटेज टूर’साठी निघाल्‍या. दीक्षाभूमी, रामन सायन्‍स सेंटर, स्‍वामीनारायण मंदिर, ड्रॅगन पॅलेस, आदासा, रामटेक, सेवाग्राम आदी ठिकाणी प्रतिनिधींना भेट दिली. यात स्पिक मॅकेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राधा मोहन तिवारी, उपाध्‍यक्ष सुमन डोंगा, नागपूरचे स्पिक मॅके प्रतिनिधी रवी सातफळे यांच्‍या नेतृत्‍वात सब्‍यसाची डे, सुप्रिती, आभा प्राशर आदींनी नागपूर व आसपासच्‍या परिसरातील ऐतिहास‍िक, धार्मिक स्‍थळांना भेटी दिल्‍या.