नागपूर विभागात १२ हजार ८६८ लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध : विजयलक्ष्मी बिदरी

June 09,2023

भूमिहीन लाभार्थ्यांना तातडीने घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्या                                          

 नागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १२ हजार ८६८ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित भूमिहीन लाभार्थ्यांना वर्गवारीच्या प्राधान्यक्रमानुसार तातडीने घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

महाआवास अभियानांतर्गत घरकुलांसाठी भूमिहीनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी  स्थापन करण्यात आलेल्या विभागस्तरीय कृतीदलाची( टास्क फोर्स) बैठक आज श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड,अपर आयुक्त आदिवासी विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनांचे प्रकल्प संचालक आणि  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विकास विभागाचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यावेळी उपस्थित होते.

विभागातील भूमिहीन नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर राज्य पुरस्कार योजनेंतर्गत घरकुलांकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने  एकूण ३७ प्रकारची वर्गवारी निर्धारित केली आहे. यापैकी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना, इतर महसूल जागेवर अतिक्रमण, गावठाण जागेवर अतिक्रमण आणि वडिलोपार्जित जागा अशा एकूण चार बाबींवर प्राधान्याने लक्षकेंद्रीत करून तातडीने भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी  शिबिरांचे आयोजन, ग्रामसेवकांच्या बैठका आदी माध्यमातून कामाला गती  द्यावी असेही त्या म्हणाल्या. 


*१२ हजार ८६८ लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा

विभागातील भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन कृतीदलाच्या मार्गदर्शनात एकूण १८ हजार ५९० भूमिहीन लाभार्थ्यांपैकी १२ हजार ८६८ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.यातील ५ हजार ७२२ भूमिहीन लाभार्थी जागेपासून वंचित आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या वर्गवारीनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा श्रीमती बिदरी यांनी घेतला. तसेच वर्गवारीनुसार प्राधान्याने लाभ देण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ७५८ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, नागपूर जिल्ह्यात एकूण ३ हजार ६२९ भूमिहीन लाभार्थ्यांना, गोंदिया जिल्ह्यात २ हजार ४५०, चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ५३५, वर्धा जिल्ह्यात १ हजार ४८८ तर गडचिरोली जिल्ह्यात ८ पैकी ८ घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


*पीएम आवास (ग्रामीण) अंतर्गत २ लाख ४४ हजार घरकुल पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य शासन पुरस्कृत घरकुल योजनांच्या माध्यमातून नागपूर विभागातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार नागपूर विभागात २ लाख ४४हजार ७५९ (८४.०९टक्के) घरकुल पूर्ण झाले आहेत.तर रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि आदिम जमात आवास योजना या राज्य पुरस्कृत योजनांतर्गत (एकत्रित सर्व योजना) ७१ हजार ४०७ (६०.२९ टक्के) घरकुल पूर्ण झाली आहेत.