अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला नागपूरमध्ये सुरुवात
June 10,2023*रात्री १२ पासून शारीरिक चाचणीला प्रारंभ ;१७ जूनपर्यंत चालेल प्रक्रिया
नागपूर : विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला शिस्तबद्ध सुरुवात झाली. बुलडाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होत आहेत.पहिल्या दिवशी भंडारा जिल्हयातील ७८० उमेदवारांची चाचणी झाली.
देशातील दुसऱ्या वर्षातील सैन्य भरतीची सुरुवात नागपूर येथून या अग्निवीर मेळाव्यामार्फत झाली आहे. यावर्षी ६ हजार ३५३ उमेदवारांची चाचणी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे.
सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर आनंद,लोकल मिलिटरी अथॅारिटी ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. जीआरसीचे कमांडर ब्रिगेडियर आनंद यांनी झेंडा दाखवून मुलांच्या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात रात्री बारा वाजता केली. तत्पूर्वी आलेल्या मुलांची संगणकीय ओळख करून घेण्यात आली. शारीरिक चाचणी स्पर्धा ही अतिशय पारदर्शी व क्षमता आधारित घेण्यात येते. धावण्याच्या स्पर्धेनंतर बाद झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या बसेसद्वारे मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.
देशात या भरती प्रक्रियेसाठी उपलब्ध होत असलेल्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधांमध्ये नागपूरच्या सुविधा अधिक उत्तम असल्याने देशातील दुसऱ्या वर्षीच्या अग्निवीरची पहिली भरती नागपूर पासून सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने क्रीडा विभागामार्फत विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅक व सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिकेने वाहतुकीसाठी वातानुकूलित बसेस, वैद्यकीय सहाय्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी व अन्य व्यवस्था उपलब्ध केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर बाहेर गावांवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खानपानाची व्यवस्था केली आहे. अनेक संस्था यासाठी संपर्कात असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने मैदानाबाहेर तात्पुरता निवारा उभारला आहे.
अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल २० मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच या मेळाव्यात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ६० हजारांच्या तुलनेत सहा हजार उमेदवार यावेळी निवडीसाठी आहे. मुलांनी यावर्षी शारीरिक चाचण्यांची उत्तम तयारी केल्याचे प्रतिबिंब यावर्षीच्या निवड प्रक्रियेत दिसून येत आहे.
काल ९ जूनला रात्री ९ नंतर उमेदवारांना मैदानात प्रवेश देण्यात आला. उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर मानकापूर क्रीडा स्टेडियमवरील अद्यावत ट्रॅकवर त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. सैन्याच्या शिस्तीमध्ये रात्रभर कालमर्यादेत व ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक उमेदवाराची चाचणी घेण्यात आली.