ओबीसी-कुणबी आरक्षणासंदर्भात सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे धडक मोर्चा
September 18,2023नागपूर : ओबीसी-कुणबी आरक्षणासंदर्भात सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे नागपूर येथे आज आयोजित धडक मोर्चा संविधान चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आला. ओबीसी-कुणबी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासाठी सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन तीव्र केल्यामुळे पोलिसांनी डॉ. आशिषराव र. देशमुख यांना काही वेळासाठी ताब्यात घेतले.
“संपूर्ण भाजपा हा ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा आहे. ओबीसी-कुणबी समाजाच्या कोट्यातून कोणालाही आरक्षण मिळू नये, ही आमची भूमिका आहे. मराठा हा ओबीसी किंवा कुणबीमध्ये येवू शकत नाही, ही न्यायोचित बाब जरांगे पाटील यांनी समजून घ्यावी. त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील ओबीसी समाजाला आश्वासित केले आहे की, ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणालाही वाटा मिळणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी कमी न करता मराठ्यांच्या आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे”, असे वक्तव्य माजी आमदार आणि महाराष्ट्राचे भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रभारी डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी याप्रसंगी केली.
जरांगे पाटील यांच्या मागणीच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकारने मराठा समाजाचं शिष्टमंडळ चर्चेला बोलावलं, आमचंही शिष्टमंडळ चर्चेला बोलवावं, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवले जाणार आहे. सरकारने जी दाखल मराठा आरक्षणासंदर्भात घेतल्या गेली तशीच दाखल आमची घ्यावी, अशी ओबीसी-कुणबी महासंघाची मागणी आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्या जाऊ नये, ही मागणी घेत हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या धडक मोर्चाचे नेतृत्व आमदार सुनिल केदार, डॉ. आशिषराव र. देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. बबनराव तायवाडे, अनिल देशमुख, नितीन राऊत, परिणय फुके, पुरुषोत्तम पाटील अशी अनेक सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि ओबीसी-कुणबी समाजाचे लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तरुण, विद्यार्थी, अबाल-वृध्द यांचा या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग होता.