चंद्रशेखर बावनकुळे यांचा पोर्टलवाले छोटे टिल्लू पंप पत्रकार संबोधत पत्रकारांना चहा प्यायला, ढाब्यावर जेवायला घेऊन जाण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला

September 25,2023

नागपूर : सध्या राजकीय वर्तुळात एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना पत्रकारांना चहा प्यायला नेण्याचा, त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जाण्याचा सल्ला देत आहेत. जेणेकरून पत्रकारांनी येत्या 2024 च्या निवडणुकीपर्यंत भाजपाविरोधात बातम्या छापू नयेत. भारतीय जनता पार्टीच्यावतीने काल रविवारी अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केले.

या बैठकीवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या भाषणाच्या काही भागाची ही ऑडिओ क्लिप आहे. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचे म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा.' असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे ? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगले काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचे. जेणेकरून आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.


ऑडिओ क्लिपमध्ये बावनकुळे नेमके काय म्हणाले ?

"ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण (छोटे टिल्लू पंप असे संबोधत) आहेत, प्रिंट मीडियावाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा, आपल्या बुथवर निगेटिव्हिटी होऊ द्यायची नाही, आपल्याविरुद्ध लिहू नये, विरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या. यात एक-दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे समजलं असेल, त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच." "मिशन महाविजय 2024 पर्यंत बुथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्या." असे या क्लिपमध्ये आहे बोलले आहे.


बावनकुळे यांचे व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत स्पष्टीकरण 


बावनकुळे म्हणाले, मी ते असेच बोललो. मी त्यांना बोललो की बाबा रे, आपण एवढे चांगले काम करतो. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात एवढे चांगले काम केले आहे. तरी आपल्याबद्दल नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांबरोबर बसा, त्यांचा सन्मान करा. त्यांना चहा प्यायला घेऊन जा, तुम्ही त्यांना चहासाठी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांना खरी वस्तूस्थिती सांगा. शेवटी पत्रकार हे आपल्या व्यवस्थेचा चौथा संभ आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांच्याबरोबर चांगले वागा. या पद्धतीचा सल्ला मी पदाधिकाऱ्यांना दिला. याच्यात काहीही वाईट नव्हते असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.