नमो महारोजगार राज्यस्तरीय मेळाव्याची तयारी पूर्ण
December 08,202355 हजार उमेदवारांची नोंदणी, 300 वर असणार स्टॅाल्स
नागपूर : नमो महारोजगार राज्यस्तरीय मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या, शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी अमरावती मार्गावरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर येथे सकाळी 10 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. या मेळाव्यासाठी 55 हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे. तसेच या परिसरात रोजगारासंदर्भात माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी 300 च्या वर स्टॅाल राहणार आहेत.
400 च्यावर रोजगार कंपन्या कार्यक्रमस्थळी असणार आहेत. विविध महामंडळाचे स्टॅाल्स, 50 स्टार्टअप,व्यक्तिमत्व विकास शिबिर, करिअर मार्गदर्शन, याविषयी मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विदर्भातील बेरोजगारांसाठी महत्त्वाचा असणारा हा महारोजगार मेळावा दि. 9 व 10 डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. जास्तीत जास्त बेरोजगारांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागातर्फे करण्यात आले आहे.