रस्ता सुरक्षेसाठी महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम: ‘झेब्रु’ शुभंकराचे नागपूरात मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
December 09,2025
• महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा शुभंकर ‘झेब्रु’ चे भव्य अनावरण; रस्ता सुरक्षेसाठी
झेब्रु ठरेल ‘रस्ता सुरक्षा जनजागृती दूत’
• नागपूर येथे अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
नागपूर, दि. ९ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा शुभंकर ‘झेब्रु’ या रस्ता सुरक्षा जनजागृती दूत अभिनव उपक्रमाचा अनावरण सोहळा नागपूर येथे उत्साहात पार पडला. ९ डिसेंबर रोजी विधानभवनमधील कॅबिनेट हॉलमध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमात राज्यातील तसेच नागपूर परिसरातील अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘झेब्रु’ शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री (परिवहन) माधुरी मिसाळ तसेच परिवहन व बंदरे विभाग, महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी व परिवहन आयुक्त विवेक भिमनवार उपस्थित होते.
झेब्रु हा महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रस्ता सुरक्षा जनजागृती दूत आहे. झेब्रा या प्राण्याच्या पट्ट्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा ‘झेब्रु’ रस्ते सुरक्षा, शिस्त आणि वाहतुकीच्या नियमांची जाणीव लोकांमध्ये निर्माण करतो. विशेषतः पादचारी सुरक्षा, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, हेल्मेट व सीट बेल्ट, वेगमर्यादा पाळणे, लेन शिस्त राखणे, पादचाऱ्यांना प्राधान्य देणे आणि जबाबदारीने वाहन चालवणे या सारख्या मूलभूत नियमांवर झेब्रु प्रभावीपणे संवाद साधू शकतो.
‘झेब्रु’ हा हेल्मेट, सावधानतेची चिन्हे आणि झेब्रा क्रॉसिंगचे प्रतीक असलेला अभिनव शुभंकर असून, तो रस्ते सुरक्षेचा संदेश अधिक प्रभावीपणे देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. समाजात जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या संकल्पनेमागे आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर महाराष्ट्रात वाहन संख्या देखील वाढत आहे. त्यात मागील काही काळात वाढलेल्या अपघातांची प्रमुख कारणे म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन. या दृष्टीने ‘झेब्रु’ हा असा शुभंकर आहे, जो सर्व वाहनचालकांचे लक्ष वेधून घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देतो.
मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस म्हणाले “झेब्रु हा फक्त एक शुभंकर नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जागरूक करणारा संदेशवाहक आहे. रस्ता सुरक्षा ही शासनाची मोहीम असली तरी तिचे यश हे नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे. आपल्या राज्यातील युवक, पालक, शिक्षक आणि समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्या प्रत्येकाने ‘झेब्रु’चा संदेश पुढे नेला, तर आपण अपघातमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोठी पाऊल टाकू शकतो. रस्ता सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे आणि ‘झेब्रु’ ही जनजागृती अधिक प्रभावीपणे करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.’’
परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाईक म्हणाले “रस्ता सुरक्षा उपक्रमांना नवे आयाम देण्यासाठी ‘झेब्रु’ हा शुभंकर तयार करण्यात आला आहे. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि डिजिटल माध्यमांतून ‘झेब्रु’ नागरिकांशी थेट संवाद साधेल. वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ दंड टाळण्यासाठी नाही तर स्वतःचे आणि इतरांचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. महाराष्ट्र परिवहन विभाग रस्ता सुरक्षा संस्कृती दृढ करण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे आणि ‘झेब्रु’ हा त्या प्रयत्नांना एक व्यापक, प्रभावी दिशा देणारा प्रकल्प ठरेल.’’
‘झेब्रु’ शुभंकरच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा हा संदेश सहज, समजण्यासारखा आणि आकर्षक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे सर्व मान्यवरांनी अधोरेखित केले. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संस्कृती रुजविण्यासाठी ‘झेब्रु’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. समारोपात “सड़क सुरक्षा -जीवन रक्षा” हा संदेश पुन्हा अधोरेखित करत रस्ता सुरक्षा ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवर्जून सांगण्यात आले.






