शासकीय कला आणि डिझाईन कॉलेजमध्ये ‘Vernacular Branding’ पुस्तकाचे प्रकाशन

December 10,2025

*डिझाईन व ब्रँडिंग क्षेत्रातील ५० वर्षांच्या योगदानाला सलाम* 

नागपूर : शासकीय कला आणि डिझाईन कॉलेज (GCAD), नागपूर येथे Vernacular Branding: Reading Identity Through Design and Visibility या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. भारतीय दृश्यसंस्कृतीच्या मूलभूत रूपांचा अभ्यास करणाऱ्या या पुस्तकाला मान्यवरांनी मनापासून दाद दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. माधवी खोडे-चावरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर; तसेच सन्माननीय अतिथी श्रीमती आस्था गोडबोले कार्लेकर, संचालक – दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता, शासकीय कला आणि डिझाईन कॉलेज, नागपूर उपस्थित होते. मान्यवरांनी पुस्तकातील लोकदृश्यसंस्कृती वरील अभ्यास विद्यार्थ्यांसाठी आणि नव्या संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त केले.

पुस्तकाचे लेखक प्रा. भूलेश्वर “अरुण” माटे, हे डिझाईन क्षेत्रातील गेल्या पाच दशके कार्यरत असलेले ज्येष्ठ नामवंत. वयाच्या ७५व्या वर्षात पदार्पण करत त्यांच्या समृद्ध कारकिर्दीचा अभिमानास्पद प्रवास उल्लेखनीय आहे. त्यांनी हॉलिडे इन आणि हयात रीजेंसी, दिल्लीमध्ये डिझाईन व्यवस्थापक,तिरुवनंतपुरम येथे अधिष्ठाता पद, तसेच आसाम विद्यापीठाचे प्र-उपकुलगुरू व नंतर कुलगुरू म्हणून भूमिका पार पाडल्या. IFFI 1993 यांसह विविध सरकारी व सार्वजनिक प्रकल्पांना त्यांनी दृश्यरचना दिली आहे. सध्या ते Envisionar Design Atelier, नागपूरचे मार्गदर्शक आहेत.


 *भारतीय दृश्यभाषा-संस्कृतीला नव्या दृष्टीने समजून घेणारे पुस्तक* 

सहलेखक कौशांबी माटे यांच्या सहकार्याने तयार झालेल्या या पुस्तकात भारताची दृश्य भाषा कशी घडते. आपल्या रस्त्यावरच्या अक्षरशैली, फलक, बाजारपेठांतील रंगसंगती, उत्सवी कला ग्राफिक्स, तसेच स्थानिक कारागीरांची हातोटी यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आहे.

कार्यक्रमात बोलताना प्रा. माटे म्हणाले, “भारताची डिझाईन परंपरा ही स्थानिक भित्तीकला, कल्पकता आणि लोकजीवनातून तयार झाली आहे. आपल्या रस्त्यांच्या आजुबाजूलाच या विषयाची शिकवण दडलेली आहे.”

कौशांबी माटे म्हणाल्या की, “या पुस्तकातून आपण त्या अनाम निर्मात्यांचा सन्मान करतो, जे रोज भारताचे दृश्य रंग घडवतात.”

या प्रकाशनाला शासकीय कला आणि डिझाईन कॉलेज, नागपूरचे विद्यार्थी, शिक्षक आणि माजी विद्यार्थी उपस्थित राहून त्यांनी डिझाईन शिक्षणातील या महत्त्वाच्या आणि प्रेरक क्षणाचे स्वागत केले. स्थानिक दृश्य परंपरांचे संवर्धन व नोंदणी का आवश्यक आहे याची जाणीवही या कार्यक्रमाने अधोरेखित केली.

हे पुस्तक २०२६ च्या सुरुवातीला शासकीय कला आणि डिझाईन कॉलेज, नागपूर तसेच प्रा. माटे सरांकडे उपलब्ध होणार आहे.