पोस्टमार्टम... एकाकी तुकाराम मुंढे....

July 13,2020

समाजात वावरणारा प्रत्येक माणूस हा स्वच्छ चारित्र्याचा असावा अशी अपेक्षा करण्यात वावगे काहीच नाही. त्यातही तो माणूस एखाद्या महत्त्वाच्या पदावर असला तर तो भ्रष्ट नसावा आणि स्वच्छ असावा असा सर्वांचाच आग्रह असतो. पदावरचा माणूस स्वच्छ असला तर त्याचे स्वागतच होईल. मात्र त्याचवेळी हा कथित स्वच्छ माणूस समोरच्या प्रत्येक व्यक्तीकडे संशयानेच बघणार असेल तर मात्र हा माणूस इतरांना असह्य होऊ लागतो. त्यातही आपण भ्रष्ट नसल्याचा आणि स्वच्छ असल्याचा अहंकार या व्यक्तिमध्ये आला की त्याचे वागणे दुराग्रही बनते. असे वागणे इतरांना असह्य होऊ लागते. त्यातूनच अशा दुराग्रही व्यक्तीची उतरण सुरु होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नेमका हाच प्रकार नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत घडतो आहे. त्यामुळेच तीन दिवसींपूर्वी म्हणजेच शुक्रवारी नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या सभेत मुंढेंना अपमानित व्हावे लागले. या बैठकीत त्यांच्या सोबतच्या सनदी अधिकार्‍यांनीही त्यांना साथ दिली नाही. या प्रकारात आता मुंढेंनी खोटेपणा केला आणि त्यायोगे बेकायदेशीर कृत्य केलीत हे सकृतदर्शनी तरी पुढे आले आहे. याचा भविष्यात त्यांना त्रास होणार हे निश्‍चित.

तुकाराम मुंढे या व्यक्तिमत्वाचा सनदी अधिकारी म्हणून जो इतिहास आहे तो बघता हा माणूस कायम वादग्रस्तच ठरलेला आहे. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा इतरत्रही प्रशासनात काम करताना लोकप्रतिनिधींशी पंगा घ्यायचा हा त्यांचा आवडीचा उद्योग असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना सतत बदलीला सामोरे जावे लागते.

नागपूर महापालिकेत 2008 पासून भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात जे सरकार सत्तारुढ झाले ते भाजपविरोधी सरकार होते. लगेचच जानेवारी 2020 मध्ये मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाले.
त्याचवेळी मुंढेंची नागपुरात झालेली नियुक्ती ही भाजपला आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी झाली आहे अशी चर्चा सुरु झाली. दुर्दैवाने मुंढेेंची लोकप्रतिनिधींशी वागणेही तशाच प्रकारचे राहिले.  संघर्षाला इथेच सुरुवात झाली.

मार्चमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरु झाला. त्यावेळी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता मुंढेंनी आपल्या योजना राबवल्या सुरुवात केली. येथे भाजप सोबत त्यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही अंगावर घेतले. परिणामी विरोध वाढत गेला. प्रत्येक टप्प्यावर लोकप्रतिनिधींना अडवायचे या त्यांच्या धोरणामुळे महापालिकेत आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष सुरु झाला. त्यात महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारीही मुंढेंच्या विरोधात गेले. महापालिकेची सर्वसाधारण सभा  होऊ न देण्याचा त्यांनी चंग बांधला. नागपूरचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीलाही अनुपस्थित राहण्याचा उद्धटपणा त्यांनी केला. त्यामुळे मुंढे एकाकी पडले.

महापालिकेची सर्वसाधारण बैठक घेण्याचे मुंढेंनी नाकारल्यावर महापौर संदीप जोशींनी राज्य शासनाकडून परवानगी मिळवून बैठक आयोजित केली. त्यात सुरुवातीला सर्वच नगरसेवक मुंढेंच्या विरोधात होते. नंतर भाजपला विरोध  करण्याचे राजकाण पुढे आल्याने काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी आपली भूमिका काहीशी सौम्य केली. असे असले तरी मुंढेंची एकूण व्हायची ती बदनामी झालीच. महापालिकेच्या आमसभेत झालेल निर्णयांची अंमलबजावणीही  करणार नाही अशी मुजोरी जेव्हा मुंढे यांनी करण्याचे पाऊल उचलले त्यावेळी स्मार्ट सिटीमधला घोटाळा महापौरांनी बाहेर काढला. त्याविरुद्ध पोलिस तक्रारही झाली. या प्रकरणात मुंढेंनी बेकायदेशीर काम केल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र  मुंढेंना आपला अहंकार महापौरांशी तडजोड करू देत नव्हता. ÷त्यातूनच मग स्मार्ट सिटी प्रकल्प संचालक मंडळाची बैठक बोलावली गेली आणि या बैठकीत शिवसेनेचा एक संचालक वगळता उर्वरित सर्व संचालक त्यांच्या विरोधात गेले.  विशेष म्हणजे नोकरीत सहकारी असलेले इतर सनदी अधिकारीही त्यांच्या विरोधात मतप्रदर्शन करते झाले. हा मुंढेंसाठी खरा धक्का होता.

मुंढेंना नागपुरात आणले त्यावेळी राजकीय वर्तुळातील कोणीतरी बिग बॉसचा पाठिंबा होता हे निश्‍चित. या पाठिंब्यामुळेच महापालिकेच्या आमसभेत काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांना शांत करणे त्यांना शक्य झाले. मात्र दरम्यानच्या काळात त्यांनी नितीन गडकरींसारख्या दिग्गजालाही अंगावर घेतले होते. परिणामी पंतप्रधान कार्यालयातच मुंढेंविरुद्ध तक्रार पोहचली. आता तेथून चौकशी होणार हे निश्‍चित आहे.

राजकारणात असलेले नेते आणि प्रशासनातील सनदी अधिकारी हे कधीही कोणाचेही नसतात हे वास्तव मुंढेंसारख्या ज्येष्ठ सनदी अधिकार्‍याने पूर्वीच लक्षात घ्यायला हवे होते. मात्र ते न घेतल्याने त्यांनी सगळ्यांशीच शत्रुत्व ओढवून घेतले. आता झाल्या प्रकारामध्ये चौकशी होऊन मुंढेंविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू झाली, किंवा किमान विभागीय चौकशी सुरू झाली तर त्यांना आज पाठिंबा देणारा बिग बॉस त्यांच्यासमवेत कधीच राहणार नाही, तो फक्त आपली राजकीय  तडजोड बघेल हा मुद्दाही मुंढेंनी आतातरी विचारात घ्यायला हवा.

प्रशासनात पदासीन अधिकारी हा स्वच्छ असायलाच हवा.मात्र त्याचबरोबर प्रसंगी लवचिक असलेला कायदा वाकवून जनहिताची चार कामे करून जनसामान्यांचा दुवा घेणाराही असायला हवा. नेमके मुुंढेंना हेच जमले नाही. मी स्वच्छ आहे  या अहंकारात समोरचा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा भ्रष्टच आहे हा दुराग्रह मनात ठेवून ते वागायला गेले खरे. मात्र असे करत असताना त्यांनी गंभीर चुकाही केल्या. स्मार्ट सिटी प्रकल्पात अधिकार नसतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी या  पदाचा बळजबरीने ताबा घेतला. त्यात बँकेमध्ये चुकीची माहिती देऊन काही व्यवहारही केले. काही कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले. हे सर्व प्रकार त्यांच्या अंगलट आले.

अजूनही वेळ गेलेली नाही. मुंढेंनी आजही लोकप्रतिनिधींशी जुळवून घ्यायला सुरुवात केली तर नागपुरात त्यांना सहकार्य निश्‍चित मिळेल. नागपूरकर हे नागपूरी संत्र्यांसारखे आहेत. बाहेरचे साल प्रसंगी टणक असलेही आणि त्याच्या रसाने डोळे झोबतीलही पण आतली संत्र्याची फोड मात्र रसाळ आणि गोड असते. ही जाणीव ठेवून मुंढेंनी नागपुरात काम करावे. नागपूरकर त्यांच्या सोबत राहतील.

-अविनाश पाठक