लाडकर बाई -एक मातृहदयी शिक्षिका

August 05,2020

काल सकाळी व्हॉट्सअ‍ॅप बघत असताना अचानक मोबाईलच्या स्क्रिनवर दुःखद बातमी असे शिर्षक असलेली एक पोस्ट आल्याचे दिसले. मी लगेचच ती पोस्ट उघडून पाहिली. 1970 साली नागपूरच्या हडस हायस्कूलमधून एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपवर ही पोस्ट आली होती. त्या गृपवर आमचा सहाध्यायी मित्र डॉ. मुकुंद पैठणकरने आमच्या शिक्षिका लाडकर बाईंचे सकाळीच निधन झाल्याची माहिती दिली होती.

 लाडकर बाईंचे निधन झाल्याचे वृत्त हे धक्कादायकच होते. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 साली हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सव प्रसंगी लाडकर बाईंची भेट झाली होती. दुसर्‍या दिवशीच आम्ही आमच्या 1970 बॅचची स्नेहभेट आयोजित केली होती. या स्नेहभेटीलाही आमच्या निमंत्रणावरून लाडकरबाई आवर्जुन उपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर मात्र भेटीचा योग आला नव्हता.

लाडकर बाई गेल्याचे कळल्यावर सर्व जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली. मला एकदम 1964 सालच्या जून महिन्याचा शेवटचा आठवडा आठवला. जेमतेम 9 वर्षाचा होतो मी. श्रद्धांनदपेठच्या महापालिका शाळेतून चौथी पास करून मी पाचव्या वर्गात हडस हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्याकाळात हडस हायस्कूल ही अत्यंत गाजलेली शाळा म्हणून ओळखली जात होती. या शाळेत मिळालेला प्रवेश तिथले शिक्षक, तिथले विद्यार्थी आणि तिथले वातावरण कसे असेल या तणावातच मी पहिल्या दिवशी शाळेत पोहोचलो. माझे नाव 5 वा अ मध्ये असल्याचे सांगण्यात आले होते त्यामुळे त्या वर्गात जाऊन आपले दफ्तर ठेवले. प्रार्थना आटोपून वर्गात पोहोचल्यावर पहिल्याच तासाला एक तरुण शिक्षिका

आमच्या वर्गावर आली. सुहास्यवदनाने सर्व वर्गावर नजर टाकत तिने पहिल्याच क्षणी सर्व विद्याथ्यार्र्ंची मने जिंकून घेतली. वर्गात कोणकोण मुले आहेत याची ओळख करुन द्या असे सांगताना पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते असे सांगत त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी सुहासिनी लाडकर, आता वर्षभर मी तुमची वर्गशिक्षिका राहणार आहे आणि तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे असे सांगून त्यांनी मुलांच्या मनात विश्‍वास निर्माण केला. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची ओळख करून घेताना त्यांचे बुजरेपण, त्यांच्या मनावरचे दडपण कसे दुर होईल याचाच

प्रयत्न ती सुहास्यवदना उत्साहाने करीत होती. परिचय आटोपल्यावर इंग्रजी शिकवायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी चौथीपर्यंत इंग्रजीचा काहीही गंध नसायचा. त्यामुळे आम्ही सर्वच इंग्रजीसाठी नवीन होता. मात्र लाडकरबाईंनी पहिल्याच दिवशी आमची इंग्रजीबाबतची भीती कमी केली आणि वर्षभरात आम्हा सर्वांचीच इंग्रजीशी चांगली मैत्री करून दिली. 

 आमची इंग्रजीशी मैत्री करणार्‍या लाडकरबाई फक्त विषयाशीच नाही तर विद्यार्थ्याशीही मैत्री कशी करायची या तंत्रात निपुण होत्या. विद्यार्थ्यांना शिक्षा करणे त्यांना फारसे मान्य नव्हते. रागवायच्याही क्वचित. त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतून त्या विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करायच्या. याच पद्धतीने त्यांनी शाळेत दोन पिढ्या घडवल्या. 40 वर्ष त्यांनी शाळेला सेवा दिली.

विद्यार्थ्याना आपलेसे करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या अनेक आठवण आज मनात येत आहेत. मला आठवते 5व्या वर्गात एका दिवशी लाडकरबाई काहीतरी शिकवत होत्या. त्यासाठी त्या फळ्यावर खडूने लिहित होत्या. संपूर्ण वर्ग शांतपणे ऐकत होता. त्यावेळी वर्गात एका बाजूला मुले तर दुसर्‍या बाजूला मुली बसायच्या. अचानक कुणीतरी शिटी वाजवल्याचा आवाज वर्गात आला. बाईंनी लगेच मागे वळून पाहिले आणि शिटी कुणी वाजवली याची चौकशी केली. मुलांच्या बाजूने पहिले विचारले, मुलांकडून कोणीच वाजवली नाही असे स्पष्ट झाल्यावर बाई मुलींकडे वळल्या. त्या काळात मुलींनी शिटी वाजवणे म्हणजे घोर अपराध समजला जात होता. त्या काळात शाळेत येणारी मुले-मुली सर्वसाधारणपणे उच्चमध्यम

वर्गीय परिवारातील असायची अशा परिवारातील मुलींनी शिटी वाजवणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्हीही कुणी शिटी वाजवली नाही असा खुलासा मुलींकडून केला गेला. त्यात एका चुणचुणीत मुलीने बाई मुली कधी शिटी वाजवतात का असा प्रश्‍न केला. त्यावर बाई मिष्किलपणे हसल्या आणि फळ्यावर लिहायला वळल्या. क्षणभरात त्या पुन्हा मागे वळल्या आणि सर्व मुलां-मुलींसमोर हलक्या आवाजात सुरेखशी शिटी वाजवली. त्यावेळीही त्यांच्या चेहर्‍यावर तोच मिष्किल भाव होता. त्या शिटीने आणि चेहर्‍यावरच्या मिष्किल भावाने संपूर्ण वर्गावरचा तणाव क्षणभरात संपला. आणि बाईंनी पुढचे शिकवणे सुरु केले.

 मन लावून शिकवणे आणि विद्यार्थी घडवणे हे तर बाईंचे ब्रीदच होते. मात्र त्याच बरोबर इतर गोष्टींमध्येही त्या रस घ्यायच्या. त्यांचे यजमान लाडकर सरही शाळेत शिक्षक होते. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सहली काढायच्या आणि त्यायोगे विद्यार्थ्यांशी जवळीक साधायची हा त्यांचा आवडता उपक्रम होता. आयुष्यातली नागपूर बाहेरची पहिली सहल मी लाडकर बाईंबरोबरच केली. त्या सहलीत प्रत्येक विद्यार्थी जेवला की नाही आणि त्याच्या काही अडचणी तर नाहीत ना हे बघितल्याशिवाय त्या जेवायला बसल्या नव्हत्या. त्यांच्यात असलेली शिक्षिका तर आम्ही रोजच बघायचो. मात्र त्यांच्यातली आई आम्ही त्या दिवशी अनुभवली.

शाळेत दररोजचे शिकवणे या व्यतिरिक्त इतर अनेक बाबींमध्ये त्या कायम सक्रिय असायच्या. मला आठवते आम्ही 7 वीत असताना शाळेने त्यांच्याकडे एनसीसीची जबाबदारी दिली. ती जबाबदारीही त्यांनी सक्षमपणे सांभाळली. बरीच वर्ष मुलींच्या एनसीसीच्या त्या प्रभारी शिक्षिका होत्या. या निमित्ताने त्यांनी अनेक विद्यार्थिनींमध्ये लष्करी शिस्त रुजवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्या काळात शिक्षकांचेे संबंध फक्त विद्यार्थ्यापूरते नसायचे तर कौटुंबिक स्नेहबंधही सहजगत्या जुळायचे. लाडकर परिवाराचे आणि आमचे असेच कौटुंबिक स्नेहबंधही

जुळले. त्यामुळे शाळा सोडल्यावरही आमचे संबंध कायम राहिले. एक उत्तम शिक्षिका असलेल्या लाडकर बाई एक गुणी अभिनेत्रीही होत्या. त्या

काळात त्यांनी रेडिओवर अनेक श्रृतिकांमधून सहभाग नोंदवला होता. त्या गायच्याही सुरेख, त्यामुळे गाण्याच्या मैफिलतही त्या सक्रिय असायच्या. मला आठवतं आम्ही शाळा सोडल्यावर जवळजवळ 5 वर्षांनी एका कार्यक्रमात त्या भेटल्या. त्या कार्यक्रमात त्या गाणार होत्या. त्यावेळी कळले की संगीताची आवड असल्यामुळे इतक्या वर्षांनी त्यांनी नारायणराव मंगु्रळकरांकडे गाणे शिकायला सुरुवात केली होती.

मध्यमवयीन असताना त्या फक्त गाणेच शिकल्या नाही तर मराठीसारख्या विषयात एम.ए. ही केले. एकदा गप्पांच्या ओघात त्यांनी मला सांगितले की, त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या फक्त मॅट्रिक होत्या. लाडकरसर त्यावेळी हडस हायस्कूलमध्ये शिक्षक होते. शाळेचे त्या वेळेचे मुख्याध्यापक पी. आर. जोशी हे देखील सर्वांशीच कौटुंबिक स्नेहबंध जपणारे व्यक्तिमत्व होते. एक दिवस ते काही कामाने लाडकरांकडे गेले तिथे सहज चौकशी केली आणि बोलण्याबोलण्यात त्यांनी बाईंना विचारले तू शाळेत शिकवायला येतेस कां? त्यावेळी नोकरीचा डोक्यात विचारही नव्हता. पण पी. आर. जोशींचा आग्रह आणि उत्तेजन यामुळे त्या शिक्षिका झाल्या. नंतर त्यांनी हळूहळू खाजगीरित्या बी.ए. ची परीक्षा दिली. ती उत्तीर्ण केल्यावर त्या

एम.ए. झाल्या. नंतर बी.एड केले. आम्ही शाळेत असताना त्या मिडलस्कूलच्या शिक्षिका होत्या. मात्र त्यांनी आपली शैक्षणिक क्षमता वाढवल्याने त्या पुढे हायस्कूलच्या शिक्षिका आणि नंतर ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिकाही बनल्या. या शिवाय त्या चांगल्या लेखिकाही होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी अध्यात्माचा अभ्यास सुरु केला आणि नंतर भागवतावर प्रवचनेही देऊ लागल्या होत्या. आयुष्यभर ज्ञानदानाचा घेतलेला वसा त्यांनी निवृत्तीनंतरही पुढे चालू ठेवला होता. 

कोणालाही मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. मला आठवते 1992 मध्ये माझी पत्नी सौ. अनुरुपा हिला शाळेने एनसीव्हीसी या अभ्यासक्रमात मराठीची अंशकालीन प्राध्यापिका म्हणून नेमले होते. या काळात बाई शाळेत ज्येष्ठ प्राध्यापिका होत्या. अनुरुपा अगदीच नवखी होती. मात्र वडिलकीच्या भावनेतून तिला पूर्णतः मार्गदर्शन करीत त्यांनी सांभाळून घेतले होते. 

मधल्या काही वर्षात माझ्या व्यवसायाचा ट्रॅक  बदलला. परिणामी मी सतत नागपूर बाहेर राहयचो. त्यामुळे लाडकरबाईंशी भेटीगाठी कमी झाल्या. नंतर आम्ही भेटलो ते शाळेच्या अमृत महोत्सव सोहळ्यातच. मला आठवते सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी माझी विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक स्नेहभेटीचा कार्यक्रम ठेवला होता. या


कार्यक्रमात सुरुवातपासून लाडकरबाई उपस्थित होत्या. एका सोफ्यावर त्या बसल्या होत्या. त्यांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी खूप मोठे झालेले असे होते. मात्र त्या दिवशी प्रत्येकजण बाईंजवळ जाऊन बसायचा. बाई प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत त्याची पाठ थोपटायच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्या आवर्जुन एक चॉकलेट द्यायच्या. त्यावेळी भेटणारे अनेक विद्यार्थी पन्नाशी ओलांडलेले आणि समाजातील प्रतिष्ठित असे होते. मात्र प्रत्येकजण त्या आपुलकीने भारावून जात बाईंनी दिलेले ते चॉकलेट प्रेमाने चघळतच तिथून उठायचे.

अशा या लाडकरबाई त्यांच्या आठवणी सांगायच्या तर वेळ पुरणार नाही इतक्या आठवणी आज मनात दाटल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे यथायोग्य वर्णन करायचे झाल्यास त्या खर्‍या अर्थाने मातृहृदयी शिक्षिका होत्या. प्रत्येक विद्यार्थ्यावर त्यांनी त्यांच्या एकुलता एक मुलगा विनयवर जसे प्रेम करावे तसेच प्रेम केले. प्रत्येकाला आपले मानले. प्रत्येकाच्या यशात आनंद शोधला आणि दुःखात धीरही दिला. फक्त शालेय जीवनातच नाही तर पुढल्या आयुष्यातही त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्गदर्शक म्हणून जगल्या. 

अशी ही थोर मातृहृदयी शिक्षिका आज आपल्यात नाही याचे मलाच नाही तर माझ्यासारख्या असंख्यांना प्रचंड दुःख आहे. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना.


-अविनाश पाठक