कामगारांनी भर पावसात केले जेलभरो आंदोलन

August 10,2020

नागपूर : १० ऑगस्ट - कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यातर्फे अंगणवाडी, आशा, शापोआ कर्मचारी यांनी संविधान चौकात भर पावसात तीव्र प्रदर्शन केले. त्याच बरोबर जेलभरो सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य सरचिटणीस शाम काळे आणि राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले यांनी केले.

अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार या योजना कामगारांना किमान वेतन लागू कराव्यात,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी या योजना कामगारांकरिता केलेल्या विमा, कामगार सुरक्षा आदी योजना अमलात आणा.व्यात व सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबविण्यात यावे.आदी मागण्यांना घेऊन गेल्या ६ ऑगस्टपासून हे कामगार संपावर आहेत. 

कोरोनाचा कहर देशात सुरू असताना मोदी सरकार कामगार कायदे मोडीत काढून कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. शेतकर्यांच्या विरोधात तीन अध्यादेश काढण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण लागू करून शिक्षणाचे संपूर्ण व्यापारीकरण सुरू केले. या धोरणामुळे अंगणवाड्यांना बंद करण्याचा डाव आहे. बँका, विमा, रेल्वे, कोळसाखदानी, एअर इंडिया, इस्त्रो या सर्व सार्वजनिक क्षेत्रांना विकायला काढले असून संसदेत चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने सर्व व्यवहार केल्या जात आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांना एकत्रित होण्यास मज्जाव आहे. परंतु अध्यादेशाद्वारे कामगारांवर आक्रमण करीत असल्याचे आरोप शाम काळे यांनी केले.

याप्रसंगी अरुण वनकर, अरुण लाटकर, अशोक थुल, चंद्रशेखर मौर्य, अशोक दगडे, एस.क्यू. झामा, माधव भोंडे, मारुती वानखेडे, राजेंद्र साठे, ज्योती अंडरसहारे, अब्दुल सादिक, बुधाजी सूरकार, आशा बोडलखेडे, मंगला लोखंडे, शालिनी बालपांडे, सरला नागुलवर, प्रीती रहुळकर, अनिता गजभिये, प्रशांत दीक्षित व शेकडो महिला-पुरुष कामगारांचा प्रदर्शन आंदोलनात सहभाग होता.