मोकाट गायीमुळे युवकाला गमवावे लागले प्राण

August 10,2020

नागपूर : १० ऑगस्ट - वाडी नगर परिषद क्षेत्रात महिन्याभरापासून मोकाट जनावरांमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले असताना शनिवार, ८ ऑगस्ट रोजी मोकाट जनावरामुळे हकनाक एका युवकाला प्राण गमवावा लागला. मृतकाचे नाव दर्शन माणिकनाथ मेर्शाम वय २५ वर्ष असून, प्लॉट क्र. ५६, वैष्णव मातानगर दत्तवाडी येथील रहिवासी होता. या दुर्घटनेत मेर्शाम कुटुंबियांचा आधार हरविल्याने दु:खाचा डोंगर कोसळले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दर्शन हा शनिवारी दुपारी २.३0 च्या सुमारास आपल्या दुचाकीने आपल्या ड्युटीसाठी अमरावती महामार्गाने जात असताना भारत अपार्टमेंट-पेट्रोल पंपसमोर अचानक त्याच्या गाडी पुढे दुभाजकामधील झुडपातून एक गाय रस्त्यावर उतरली. अचानक झालेल्या या बदलाचा अंदाज न आल्याने व गाडी नियंत्रित करता न आल्याने त्याची धडक सरळ या मोकाट जनावराला लागली व तो जोरदार पद्धतीने खाली पडून महामार्गाच्या दुभाजकाला धडकला. यात गंभीर जखमी झाला. अपघाताचे चित्र व व जोरदार आवाज एकूण जवळपासचे नागरिक व महामार्गाने जाणारे वाहनचालकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

वाडी पोलिसांना या घटनेची सूचना मिळताच वाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दर्शनला वाडीतील खासगी वेल्ट्रीट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

दोन तासाच्या शर्तीच्या उपचाराच्या प्रयत्नानंतरही उपचाराला दाद न देता त्यांची ४.३0च्या सुमारास प्राणज्योत मालवली. अपघाताची सूचना दर्शनच्या घरी माहिती होताच घरी हाहाकार उडाला व कुटुंबीयांनी धावतच वेल्ट्रीट हॉस्पिटल गाठले. मात्र, दर्शनच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे मित्र व कुटुंबियांवर आघात कोसळला. वाडी पोलिसांनी पंचनामा व बयान नोंदवून मृतदेह नागपूरला उत्तरीय तपासणी साठी पाठवले व फिर्यादी माणिकराव शंकर मेर्शाम वय ५२ वर्ष यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहे.