चामोर्शी पोलिसांनी उध्वस्त केले मोहाच्या दारूचे अड्डे

August 10,2020

गडचिरोली : १० ऑगस्ट - चामोर्शी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर असलेल्या विष्णूपूर गावातील बंगाली नागरिक आजूबाजूस असलेल्या जंगल परिसराचा फायदा घेऊन मोठय़ा प्रमाणात मोहफुलाची दारू काढत असल्याच्या मिळालेल्या गोपीनय माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिसांनी जंगल परिसरात धाडसत्र चालवून २ लाख ५0 हजाराचा मोहसडवा उद्ध्वस्त केला. याप्रकरणी १३ आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. मात्र, यातील सर्व आरोपी फरार झाले. 

कोविड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये मोहफुलाची हातभट्टी दारूच्या विक्रीचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. तालुक्यातीज विष्णूपूर जंगल परिसरातील अवैध रित्या मोहफुलाची दारू काढण्यासाठी मोहसडवा टाकण्यात आल्याची गुप्त माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी विष्णूपूर जंगल परिसरात धाडसत्र राबविले असता जंगलात ठिकठिकाणी ४५ मोठे प्लास्टीकचे ड्रम जमिनीत गाडून त्यामध्ये २ लाख ५0 हजार रुपये किंमतीचे मोहफुल दारू गाळण्याकरिता आंबवण्यासाठी ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर मोहसडवा जागेवर नष्ट केला. यातील आरोपी अविनाश बिश्वास, सुकदेव बिश्वास, साधन गुड्डीयॉ, भजन गुड्डीयॉ, पुष्पजित मंडल, नारायण मंडल, अजित बिश्वास, लखन बिश्वास, प्रणस सरदार, समय वाढई, शाम हलदर, सुरजो हलदर, सुकेन सख्याहारी सर्व रा. विष्णूपूर हे फरार झाले असून त्यांचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती ठाणेदार जितेंद्र बोरकर यांनी दिली. 

सदर कारवाई पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, पोहवा राजू उराडे, नजीर पठाण, संजय चक्कावार, जीवन हेडावू, सुमित गायकवाड, रजनीकांत पिल्लेवान, घनश्याम पिटाले, संदीप भिवनकर, विलास गुडे, रमाकांत शिंदे, राहूल पारेल्लीवार यांनी केली.