पतंजली करणार का आयपीएल प्रायोजित?

August 11,2020

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट - इंडियन प्रीमिअर लीगच्या टायटल स्पॉन्सर विवोने यंदा माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. भारत-चीन सीमेवरील वादानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही (बीसीसीआय) दबाव वाढत होता. त्यामुळे त्यांना यंदा आयपीएलच्या टायटल स्पॉन्सर म्हणून विवोने माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. विवोच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला ४४0 कोटींवर पाणी सोडावे लागले आहे. पण, याचा फायदा बाबा रामदेव यांच्या पतंजलीला होण्याची शक्यता आहे. पतंजलीने आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी बोली लावण्याची उत्सुकता दर्शवली आहे आणि त्यांना ही डिल स्वस्तात मिळू शकते. 

विवो इंडियाने २0१८मध्ये २१९९ कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला विवो कडून ४४0 कोटी मिळतात. विवोची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार २0२१, २0२२ आणि २0२३ ला विवो पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पतंजलीला जागतिक बाजारात ओळख मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजरवाल यांनी सांगितले. बीसीसीआयकडे ते लवकरच प्रस्तावही पाठवणार आहेत. आयपीएलचे टायटल स्पॉन्सरचे हक्क मिळवल्यास, त्याचा फायदा आयपीएलपेक्षा त्या कंपनीलाच होणार आहे. तसेच भारताच्या आत्मनिर्भर बनण्याच्या निर्धारालाही मोठे प्रोत्साहन मिळेल, असे ब्रँड तज्ज्ञांनी मत व्यक्त केले. नव्या टायटल स्पॉन्सरसाठी बीसीसीआय लवकरच एक जाहीरात काढणार आहे, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे बाजारातील मंदी लक्षात घेता बीसीसीआय ५0-६0 टक्के कमी किमतीत ही स्पॉन्सरशीप देण्यास तयार आहे. त्यामुळे जर पतंजली यासाठी प्रस्ताव ठेवत असेल तर त्यांना ४४0 कोटींएवजी २६४ कोटी किंवा त्याहून कमी रक्कम मोजावी लागेल.