कोरडीत धुरांडे पाडताना एक पर्यवेक्षक जखमी

August 11,2020

नागपूर : ११ ऑगस्ट - कोराडी  औष्णिक विद्युत केंद्रातील धुरांडे पाडताना एक पर्यवेक्षक गंभीर जखमी झाला. या घटनेने त्या परिसरात खळबळ उडाली. दिनू काकडे हे त्याचे नाव असून त्याला अलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महानिर्मितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील १०५ मेगावॅट क्षमतेच्या चार संचांमधील ४० वर्षे जुन्या दोन चिमण्या (धुरांडे) जीर्ण झाले असल्याने त्यांना काल  दुपारी १२ वाजताच्या सुमारास जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले. दोन चिमण्यांची उंची प्रत्येकी ७२ मीटर असल्याने चिमणी पाडताना सभोवतालचा ३० मीटर त्रिज्या परिसर सुरक्षा कठड्याने बंदिस्त करण्यात आला होता. सोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णवाहिका आणि सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते. 

तज्ज्ञ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हे पाडकाम करण्यात आले. दुपारी १२ च्या सुमारास चिमणीचा ढाचा खाली कोसळला. 

मात्र, एक खडा सुमारे २०० मीटरवर  उडून कंत्राटी पर्यवेक्षक दिनू काकडे यांच्यावर पडला. ते दिसताच धावपळ उडाली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतुन नागपुरातील अलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली असून वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.