छेडखानी करणाऱ्यांपासून वाचविण्याच्या प्रयत्नात विद्यार्थिनीचा मृत्यू

August 11,2020

लखनौ : ११ ऑगस्ट - छेडखानी करणार्या टारगटांपासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात एका विद्यार्थिनीचा मंगळवारी अपघातात मृत्यू झाला. ही घटना उत्तरप्रदेशातील बुलंदशहरात घडली. सुदीक्षा भाटी असे या तरुणीचे नाव असून, ती अमेरिकेतील बॅब्सन महाविद्यालयात शिकत होती. काही दिवसांपूर्वीच ती अमेरिकेतून भारतात परतली होती. सुदीक्षाला मागील वर्षी एचसीएलतर्फे 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती.

 माध्यमांच्या वृत्तानुसार सुदीक्षा भाटी तिच्या काकांसोबत स्कूटीवरून औरंगाबादला मामाकडे जात होती. त्यावेळी बुलेटवर असलेल्या दोघांनी तिचा पाठलाग केला. यावेळी हे टवाळखोर तिच्याविषयी अचकट-विचकट बोलत होते. यादरम्यान बुलेटवर असलेल्या तरुणाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सुदीक्षाची स्कूटी बुलेटवर जोरदार धडकली. या अपघातात ती स्कूटीवरून पडली. गंभीर जखमी झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

 सुदीक्षा 20 ऑगस्ट रोजी अमेरिकेला परत जाणार होती. पण, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. गौतमबुद्ध नगरच्या दादरीमध्ये राहणारी सुदीक्षा अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील ढाबा चालवतात. तिने पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले. यानंतर प्रवेश परीक्षेद्वारे तिचा प्रवेश एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांच्या सिकंदराबादमधील शाळेत झाला. सुदीक्षा बारावीच्या परीक्षेत बुलंदशहरातून सर्वप्रथम आली होती. यानंतर उच्चशिक्षणासाठी तिची निवड अमेरिकेतील महाविद्यालयात झाली. शिक्षणासाठी तिला एचसीएलकडून 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही देण्यात आली होती.